पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:57 IST2025-12-31T15:54:15+5:302025-12-31T15:57:01+5:30
ST Pratap Sarnaik News: श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केले असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
ST Pratap Sarnaik News: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित, सुलभ आणि सुव्यवस्थित साथ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
दि. १ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या या पवित्र यात्रेसाठी सातारा विभागातील सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, मेढा,पाराव- खंडाळा व वडूज या आगारांतून तसेच सांगली विभागाकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जेणेकरून भाविकांना वेळेत, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येईल.
भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
प्रवास सुरळीत व्हावा यासाठी वाहनांची तांत्रिक तपासणी, चालक-वाहकांचे नियोजन व विश्रांती, इंधन उपलब्धता, स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजन या सर्व बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत स्वतंत्र यात्रा प्रमुख, सहाय्यक अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबवली जाणार असून, पोलिस, आरटीओ आणि परिवहन विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाविकांचा प्रवास ही केवळ वाहतूक सेवा नाही, तर ती आमच्यासाठी श्रद्धेची सेवा आहे. त्या सेवेसाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने उभे आहे, असे भावनिक शब्दांत प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. या व्यापक आणि दूरदर्शी नियोजनामुळे पाल-खंडोबा यात्रेत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, वेळेवर आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.