लाडक्या बहिणींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:49 IST2025-08-16T09:48:57+5:302025-08-16T09:49:03+5:30
ST Bus Income News: घरी सण असून कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून एसटीला विक्रमी उत्पन्न मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले.

लाडक्या बहिणींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
ST Bus Income News: रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात एसटी महामंडळाला विक्रमी उत्पन्न मिळते. या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिणी भावाकडे जातात. गेली अनेक वर्षे रक्षाबंधनाच्या सणाच्या कालावधीत एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. यंदा रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला भरघोस उत्पन्न मिळाले, तर एकाच दिवशी एसटीची ३९ कोटींची कमाई झाली. याबाबत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये सुमारे दोन कोटी प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दर्शवली. यामुळे एसटी महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे परतीचा प्रवास करताना म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.यावर्षीच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये, तर सोमवारी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसांच्या कालावधीत १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे. रक्षाबंधनानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न मिळवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, गेल्या वर्षी रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्ट २०२४ या चार दिवसांमध्ये एसटी भरगच्च भरल्या होत्या. यातून एसटी महामंडळाला १२१ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले. २० ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल ३५ कोटी रुपये उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले. हा महसूल २०२४-२५ या आर्थिक वर्षातील विक्रमी महसूल होता.