SSC Result 2020: दहावीच्या निकालात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; 'लातूर पॅटर्न' ठरला 'सुपरहिट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 15:20 IST2020-07-29T15:19:45+5:302020-07-29T15:20:34+5:30
SSC Result 2020: विभागवार निकालात शेवटून दुसरा असलेला लातूर विभागात पैकीचे पैकी गुण मिळवण्यात पहिला

SSC Result 2020: दहावीच्या निकालात 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; 'लातूर पॅटर्न' ठरला 'सुपरहिट'
मुंबई: राज्य शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (२९ जुलै) जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९२.०० निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे.
राज्याचा विभागवार निकाल पाहता, त्यात लातूर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. लातूर विभागाचा निकाल ९३.०९ टक्के इतका लागला आहे. मात्र १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत लातूर विभागानं पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. यातले तब्बल १५१ विद्यार्थी एकट्या लातूरचे आहेत. म्हणजेच १०० टक्के गुण मिळवणारे राज्यातले ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी लातूर विभागातले आहेत.
लातूरनंतर १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद विभागात आहेत. औरंगाबाद विभागातल्या ३६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर कोल्हापूर (१५), पुणे, अमरावती (प्रत्येकी १२), कोकण (११), नागपूर (३), मुंबई (२) या विभागांचा क्रमांक लागतो. तर नाशिक विभागातल्या एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळवता आलेले नाहीत.
सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याच्या बाबतीत लातूर विभागानं कायमच आघाडी राखली आहे. २०१९ मध्ये राज्यात केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळवता आले होते. त्यातले १६ विद्यार्थी एकट्या लातूर विभागाचे होते. २०१८ मध्ये राज्यात १२५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. यापैकी ७० जण लातूर विभागातले होते. २०१७ मध्ये १९३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवण्याची किमया साधली. त्यातही लातूरनं दबदबा राखला होता. त्यावेळी लातूर विभागातल्या ४५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले होते.