Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:43 IST2025-10-23T17:42:11+5:302025-10-23T17:43:59+5:30
Rajendra Phalke: शरद पवार गटातील माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची आज भेट झाली.

Maharashtra Politics: कर्जत- जामखेडसह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानी आज महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी अनपेक्षितपणे सदिच्छा भेट दिली. राजेंद्र फाळके यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर लगेचच प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या या सदिच्छा भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीदरम्यान प्रा. शिंदे आणि फाळके यांच्यात काही काळ चर्चा झाली. भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, राजकारणातील विविध विषयांवरही दोघांमध्ये अनौपचारिक संवाद झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या भेटीच्या वेळी कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी आप्पा फाळके, तसेच फाळके परिवारातील इतर सदस्यही उपस्थित होते. प्रा. राम शिंदे यांनी फाळके परिवाराशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
या सदिच्छा भेटीमुळे केवळ कर्जत-जामखेडच नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राजकीय जाणकार आणि कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क-वितर्क सुरू झाले असून, या भेटीचा पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्जत-जामखेड परिसरात ही भेट चर्चेचा प्रमुख विषय ठरली असून, दोन्ही नेत्यांमधील संवाद भविष्यातील राजकीय घडामोडींना दिशा देणारा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.