गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:30 IST2025-07-20T10:30:05+5:302025-07-20T10:30:21+5:30
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
नवी मुंबई :गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २५ जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस, मडगाव (०११८५/०११८६) ही विशेष गाडी २७ ऑगस्ट व ३ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल व त्याचदिवशी दुपारी ०२.३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीची गाडी मडगावहून सायंकाळी ०४.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीमध्ये २१ एलएचबी डबे
असून, सर्व प्रमुख कोकण स्थानकांवर थांबे असतील. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस, सावंतवाडी रोड (०११२९/०११३०) ही गाडी २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ०८.४५ वाजता सुटेल व रात्री १०.२० वा. सावंतवाडीत पोहोचेल.
२२ डब्यांची रचना
लोकमान्य टिळक टर्मिनस, सावंतवाडी रोड गाडीला २२ डब्यांची रचना असून, थांबे कोकणातील प्रमुख स्टेशनवर असतील. पुणे- रत्नागिरी विशेष (०१४४५/०१४४६) आणि (०१४४७/ ०१४४८) या गाड्या अनुक्रमे मंगळवार व शनिवार (२३, २६, ३० ऑगस्ट व २, ६, ९ सप्टेंबर) रोजी रात्री १२.२५ वाजता पुणे स्थानकावरून सुटतील आणि सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीत पोहोचेल.
परतीचा प्रवास सायं. ०५.५० वा. सुरू होऊन दुसऱ्या दिवशी स. ५ ला पुण्याला होईल. थांबे लोणावळा, कर्जत, पनवेलसह कोकणातील स्थानकांवर असतील, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी सांगितले.