विशेष: अक्षरांना प्राणतत्त्व देणारे गुरू डॉ. विठ्ठल वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:56 IST2025-08-31T14:55:56+5:302025-08-31T14:56:45+5:30
काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते.

विशेष: अक्षरांना प्राणतत्त्व देणारे गुरू डॉ. विठ्ठल वाघ
ग्रामसंस्कृती आणि शेती हा अर्थार्जनाचा एकमेव व्यवसाय. या पार्श्वभूमीवर मी १९७०च्या आसपास लिहिता झालो. लेखनाची आणि संवादाची वाट शोधत अंबाजोगाईपासूनच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पदरची भाकरी घेऊन हजेरी लावली. तेव्हा कुठं थोडी फार वाट सापडली. परंतु १९८१ ला श्रीरामपूर येथे शब्दालय प्रकाशनाच्या वर्धापन दिनात डॉ. विठ्ठल वाघ यांची थेट मनाला भिडणारी कविता ऐकून भारावून गेलो आणि गुरू सापडल्याचे समाधान अक्षर झाले.
काव्य रसात्मक असले पाहिजे, कविता कागदासाठी नसते, कविता माणसाचं दु:ख मांडण्यासाठी, ते हलकं करण्यासाठी असते. ईश्वराचा साक्षात्कार निसर्गच आहे. कृषकांनी आता आक्रमक झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टी माहिती होत गेल्या. सर्वांत महत्त्वाचं कागदावरच्या अक्षरांना प्राणतत्त्व देऊन आशयाची आकृती रसिकांपुढे उभी राहिली पाहिजे, हे बापूंच्या (विठ्ठल वाघ यांच्या) कविता सादरीकरणातून अवगत होत गेले.
बैल घराची श्रीमंती
बैल दारचे वैभव
बैल माझ्या घरातला
पिढ्यापिढ्यांचा उत्सव (बैल)
आम्ही मेंढरं मेंढरं
यावं त्यानं हाकलावं
पाचा वर्साच्या बोलीनं
होते आमचा लिलाव
काया मातीत मातीत
तिफन चालते
इज नाचते थयथय
ढग ढोल वाजवते...
भाषेची मौलिकता, मौखिकता असते. ही मौखिकता समूहाशी संवाद साधते. मी का लिहितो? त्या परिसराने माझा पिंड पोसला, त्या परिसराची जाणीव, वेदना माझ्या लेखनात आहे काय? तू काळाचे प्रतिनिधित्व करणार आहेस का? वर्तमानाशी संवाद असणे गरजेचे आहे. या सर्व जाणिवा मला प्रकर्षाने बापूंच्या कवितेने दिल्या. कवीचा स्वर हा कवितेसाठी मातृस्वर आहे. ये हृदयीचे ते हृदयी घातिले, हे सामर्थ्य त्या स्वरांमध्ये असते. तसेच मुक्तछंदाच्या शापातून जर मराठी कवितेला सोडवायचे असेल तर कवितेला समूहसंवेदी आणि लयीची नितांत गरज आहे. स्वर अक्षरांना अमरत्व देतो. या सर्वांचा साक्षात्कार बापूंच्या कवितेतून झाला. त्यामुळेच जाणतेपणाने गुरू अभ्यासावा, ही जाण माझे ठायी आली. थेट विठ्ठलाशी भांडण्याचं धारिष्ट्य मला मिळालं.
काय रे तू माझी, वाहशील चिंता
तूजशीस दाता, मी शेतकरी
तुझीच गा चिंता, मी वाहतो रातंदिन
तुज पायी अन्न, उभवितो
काय तू ही तिथे, उभा विटेवरी
अरे इथे पंढरी, काळीमाय