"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:20 IST2025-07-05T18:37:13+5:302025-07-05T19:20:42+5:30
ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात मराठी विषयी कोणी बोललं नाही असं म्हटलं.

"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
CM Devendra Fadnavis: मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलं. त्रिभाषा सूत्राचा निर्णय मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या कार्यक्रमात विजयोत्सव दिसला नाही असं म्हटलं.
"मी राज ठाकरेंचे आभार मानतो कारण त्यांनी सगळं श्रेय मला दिलं आहे. मी तोडणारा नाही हे त्यांच्या लक्षात आलं असेल, बाळासाहेबांचा आशीर्वाद सुद्धा मलाच मिळाला कारण माझ्यामुळेच हे दोन्ही भाऊ एकत्र आले. मी यांना वेगळं केलं नव्हतं. एकमेकांशी भांडून ते वेगळे झाले होते. उद्धव ठाकरेंनीच त्यांना बाहेर काढलं होतं," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"आजचा कार्यक्रम विजयोत्सव असेल मला वाटलं होतं पण हे रुदालीचं रडणं होतं. यात कुठेही विजयोत्सव दिसला नाही. कारण माझं सरकार गेलं, मला सरकार द्या, मला महापालिका द्या असं रडणं तिथं सुरु होतं. मराठीच्या बाबतीत काहीच बोलणं झालं नाही. त्यांना मराठीविषयी काहीही आस्था नाही. त्यांना मराठी माणसाशी काहीही देणंघेण नाही. त्यांचा मनात जळफळाट आहे कारण २५ वर्षे यांच्या हातात मुंबई महापालिका होती. तरीही ते मुंबई आणि मराठी माणसाला काहीही देऊ शकले नाहीत. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. मराठी माणसाला त्यांचा हक्क मिळवून दिला. बीडीडी चाळ आणि पत्रा चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत आणि ते हिसकावून घेणारे आहेत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आडवे झालेल्यांनी उठण्याची भाषा करु नये- एकनाथ शिंदे
"तीन वर्षांपूर्वी उठाव केला. त्यावेळी दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता. त्यावेळी ते आडवे झाले. त्यातून सावरले नाहीत. आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उठण्याची भाषा त्यांनी करू नये," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.