भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं...; म्हणाले, गोष्ट काळजाला चाटून गेली...! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:35 IST2025-04-04T12:34:15+5:302025-04-04T12:35:44+5:30
Shahajibapu Patil : "आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजवळ तुमची गोटी असली पाहिजे."

भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं...; म्हणाले, गोष्ट काळजाला चाटून गेली...! नेमकं काय घडलं?
ज्याने पाणी अडवले (सांगोल्याचे) त्याला खासदार म्हणून पाठवले आणि पाणी देणारा घरात बसून आहे. आपलं आपल्याला हाणून-हाणून घ्यावं वाटतं, असे म्हणत शहाजीबापू यांनी भर सभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतले. एवढेच नाही तर, "आज येथे एवढा सत्कार आहे जयाभाऊंचा आणि त्या माणसानं येथे हार घेतला नाही. गोष्ट काळजाला चाटून गेली माझ्या." असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे. ते सांगोल्यात एका जाहीस सभेत बोलत होते.
सांगोला येथे शुक्रवारी (3 एप्रिल) रात्रीच्या सुमारास सर्वपक्षीय नेत्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार केला, यावेळी शेकापचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आदी उपस्थित होते.
शहाजीबापू म्हणाले, "काँग्रेस काय आपली शत्रू होती का? माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. जयाभाऊंचं गेलंय, रंजित दादांचं गेलंय. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जिवनभर पाण्यासाठी काँग्रेस पक्षातून झगडा दिला. दऱ्या खोऱ्यात माणूस फिरला. पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला साथ दिली नाही. मात्र ते जेव्हा शिवसेनेतून खासदार झाले, १९९५ ला शिवसेना-भाजपचं सरकार आलं, सर्वजण कागदं काढून बघा, टेंभू मंजूर केव्हा झाले? म्हैसाळ मंजुर केव्हा झाले? उजनी केव्हा मंजूर झाले? तुमच्या या सर्व योजना शिवसेना आणि भारतीय जनाता पक्षाच्या काळात मंजूर झाल्या आहेत."
पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, "या ठिकाणी कोण नव्हतं, विलासराव आले, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, राजारामबापू पाटील, बाळासाहेब देसाई, पतंगराव कदम, अशी डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण, आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला, तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षानेच लावला हे मी तुम्हाला जाहीर सांगेन."
राजकारणाच्या वाटा धरताना कोणत्या धरायच्या हे तुम्ही ठरवायला हवे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सल्ला देताना शहाजीबापू म्हणाले, "तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगारपक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय, एवढी बातमी आम्हाला आली की, दंडवत घालत तुमच्या घरी येतो आणि भाई गणपतरावजी देशूम यांच्या पत्नीचं आधी दर्शन घेतो आणि लहान असलात तरी तुमचंही दर्शन घेतो. आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजवळ तुमची गोटी असली पाहिजे."
पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, आता जयाभाऊ सांगेल त्याच चिन्हाला मतदान करायचे. आईची शपथ तुम्हाल... हात वर करा. देणार की नाही, खरं हात वर करा. ज्याने पाणी अडवले त्याला खासदार म्हणून पाठवले आणि पाणी देणारा घरात बसून आहे. आपलं आपल्याला हाणून-हाणून घ्यावं वाटतं, (शहाजीबापू यांनी भर सभेत स्वतःच्या तोंडात मारून घेतलं). काय माणसं आहोत आपण, काय म्हणून केलं आपण हे, कशासाठी हे पाप केलं, आज येथे एवढा सत्कार आहे जयाभाऊंचा आणि त्या माणसानं येथे हार घेतला नाही. गोष्ट काळजाला चाटून गेली माझ्या."