पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:02 IST2025-07-15T13:02:04+5:302025-07-15T13:02:35+5:30
Solapur Crime News: पत्नीला जाळून मारल्याच्या आरोपाखाली पतीला अटक करण्यात आल्यानंतर सदर महिला तिच्या प्रियकरासोबत जिवंत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
पत्नीला जाळून मारल्याच्या आरोपाखाली पतीला अटक करण्यात आल्यानंतर सदर महिला तिच्या प्रियकरासोबत जिवंत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका महिलेचा मृतदेह घराजवळ असलेल्या गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर या महिलेच्या पतीनेच तिला जाळून मारल्याचा आरोप झाल्याने तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. मात्र नंतर ही महिला साताऱ्यामध्ये एका व्यक्तीसोबत सापडली, त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. तसेच घराजवळ जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेह कुणाचा होता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचा विवाह नागेश सावंत याच्याशी झाला होता. त्यांना एक दोन वर्षांची मुलगीही आहे. दरम्यान, १४ जुलै रोजी पहाटेच्या वेळी दशरथ दांडगे यांना किरण हिच्या सासरहून तिच्या चुलत सासऱ्यांचा फोन आला. त्यांनी किरण हिने स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर किरण हिच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरी धाव घेतली.
तिथे गेल्यावर किरण हिने घराबाहेर स्वत:ला जाळून घेतले. गवताच्या पेटलेल्या गंजीत तिचा मृतदेह सापडल्याचे तिचा पती नागेश याने सासरे दशरथ दांडगे यांना सांगितले. मात्र या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असावं या संशयाने किरण हिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी किरणचा पती नागेश याला अटकही केली.
मात्र पोलिसांनी अधिक तपास सुरू केल्यावर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. ज्या किरण नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला असा दावा केला जात होता ती साताऱ्यामध्ये एका व्यक्तीसोबत जिवंत सापडली. तसेच ती व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे आता या महिलेच्या घराजवळ गवताच्या गंजीत सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. आता त्याचा अहवाल आल्यानंतरच याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.