भाजपाचे ६ शिलेदार, प्रचारापासून नियोजनाची सगळी जबाबदारी; निवडणुकीत किती जागा लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 10:01 IST2024-09-13T09:15:26+5:302024-09-13T10:01:31+5:30
भाजपने ६ नेत्यांवर सोपविली जबाबदारी; बावनकुळे, महाजन यांचा समावेश

भाजपाचे ६ शिलेदार, प्रचारापासून नियोजनाची सगळी जबाबदारी; निवडणुकीत किती जागा लढणार?
मुंबई - विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या राज्यातील सहा नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रचाराच्या नियोजनापासून सर्व जबाबदारी त्यांच्यावर असेल.
विदर्भ - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाडा - खा. अशोक चव्हाण, कोकण - मंत्री रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उत्तर महाराष्ट्र - मंत्री गिरीश महाजन, मुंबई - आ. आशिष शेलार या नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी असेल. निवडणुकीसाठीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आहेत. पक्षाचे दिल्लीतील मुख्यालय आणि मुंबईतील प्रदेश कार्यालयाने दिलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी हे नेते करतील.
१६० जागा लढणार
भाजपने २०१४ च्या निवडणुकीत १२२ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये हा आकडा १०५ झाला. यावेळी भाजप १६० जागा महायुतीमध्ये लढेल असे म्हटले जाते. त्यापैकी १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात किमान ५० उमेदवार जाहीर करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. महायुतीच्या जागा वाटपाला नवरात्रातच अंतिम स्वरुप दिले जाईल, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
आज राज्यभर निदर्शने
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने शुक्रवारी राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत. ‘काँग्रेस हटाओ, आरक्षण बचाओ’चा नारा देत ही निदर्शने होतील.