"आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतीस? माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुझं सगळं गबाळ उचकीन", अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगेंनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना 'जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही', असे प्रतिआव्हान चित्रा वाघ यांनी मनोज जरांगेंना दिलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली, ते महाराष्ट्राला पटणार नाही. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी मोठं काम करत आहात. दुसरे कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या आईबद्दल कोणी बोललं असतं, तरी आम्ही सहन केलं नसतं."
माझं नाव चित्रा वाघ, कुणाला घाबरत नाही
"मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली. गबाळं उचकीन म्हणाले. जे उचकायचं ते उचका. मी काही त्यांना घाबरणार नाही. माझं नाव चित्रा वाघ आहे. गेली २७ वर्षे मी राजकारणात आहे. समाजकारणात आहे. आमदार आहे. हे त्यांना माहिती नसेल. मी आमदार असले, काय आणि नसले काय, जे काम करायला पाहिजे, ते मी करत राहणार आहे", असे उत्तर चित्रा वाघ यांनी मनोज जरांगेंना दिले.
मी रोज शिव्या ऐकते -चित्रा वाघ
"मनोज जरांगेंनी त्यांचे शब्द मागे घेतले, तर स्वागत आहे. केवळ पुनरावृत्ती होऊ नये, इतकीच अपेक्षा आहे. मी बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते म्हणून थांबले होते. ते जे बोलले ते मी ऐकलं, पण मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. मी रोज अनेकांच्या शिव्या ऐकते", असे चित्रा वाघ जरांगेंच्या टीकेवर म्हणाले.
"मनोज जरांगेंनी त्यांचा लढा सुरू ठेवावा. कोणाच्या आया-बहिणींना मध्ये आणू नये, इतकंच मला सांगायचं आहे. आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलोय, हे जरांगेंना कुठे माहिती आहे. घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली. जे करायचं ते करा, मला फरक पडत नाही", असे उत्तर चित्रा वाघ यांनी मनोज जरांगेंना दिले.