मागच्या काही दिवसांपासून महिलांवर होत असलेले अत्याचार ही राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोरील मोठी आव्हानात्मक बाब ठरली आहे. दररोज येणाऱ्या अत्याचारांच्या बातम्यांमुळे जनमानसामध्ये चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, परदेशात फिरायला गेलेल्या साताऱ्यातील दोन तरुणांनी केलेल्या कृत्यामुळे राज्यासह देशावर मोठी नामुष्की ओढवली आहे. थायलंमध्ये फिरायला गेलेल्या या दोन्ही तरुणांनी तिथे एका जर्मन महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालं असून, या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार साताऱ्यातील कोरेगाव येथील दोन तरुण थायलंडमध्ये फिरायला गेले होते. तिथे फिरत असताना ते सुरत थानी प्रांतातील रीन बीचवर फिरायला गेले होते. त्या ठिकाणी या दोघांनीही एका जर्मन महिलेवर बलात्कार केला.
दरम्यान, पीडित महिलेने याची तक्रार कोह फांगन पोलीस ठाण्यामध्ये केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती याच्या आधारावर संशयित आरोपी म्हणून थायलंडमध्ये फिरायला गेलेल्या साताऱ्यामधील या दोन तरुणांना अटक केली. अटकेनंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.