Video : शिवसेनेला पैसे बुडवायचं लायसन्स मिळालंय का ? राजू शेट्टी आमदारावर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 08:05 IST2018-11-13T07:59:59+5:302018-11-13T08:05:04+5:30
खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दराचे पैसे मिळाले नसल्याबद्दल पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात आंदोलन केले.

Video : शिवसेनेला पैसे बुडवायचं लायसन्स मिळालंय का ? राजू शेट्टी आमदारावर भडकले
मुंबई - खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना आमदाराला चांगलाचा धडा शिकवला. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयातून फोनवर बोलताना शेट्टी यांनी शिवसेनेचे आमदारा तानाजी सावंत यांना दम भरला. तसेच शिवसेना आमदार असला म्हणून काय झालं ? शिवसेनेला काय शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचं लायसन्स मिळालं आहे का ? अशा शब्दात आमदाराविरुद्ध संताप व्यक्त केला.
खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दराचे पैसे मिळाले नसल्याबद्दल पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात आंदोलन केले. तसेच जोपर्यंत संबंधित कारखानदाचं गाळप लायसन्स रद्द होत नाही, तोपर्यंत मी कार्यालयातून जाणार नाही, असा पवित्राही राजू शेट्टी यांनी घेतला. शेट्टींच्या या पवित्र्यामुळे अधिकाऱ्यांचीही घाबरगुंडी झाली. त्यानंतर, आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्स कारखान्याचा गाळप परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला.
एफआरपीची थकीत रक्कम न देताच खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविला असून संबंधित साखर कारखान्यांचे गाळप परवाने कसे दिले,असा प्रश्न खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी साखर आयुक्तांना विचारला.तसेच भैरवनाथ शुगर कारखान्यांचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्याशी मोबाईलवर संभाषण केल्यानंतर झालेल्या वादानंतर शेट्टी यांनी आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन केले. शेतक-यांना एफआरपीची रक्कम न देता काही साखर कारखान्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गाळप परवाना मिळविला. त्याबाबत चर्चा करण्यासाठी शेट्टी यांनी साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याशी संवाद साधला. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.सोनारी या कारखान्याने शेतक-यांची एफआरपीची रक्कम थकवल्याची तक्रार आयुक्तांकडे केली.यावेळी शेतक-यांच्या तक्रारीचे निवेदन दिले. त्यावर साखर आयुक्तांनी फोनवर भैरवनाथ शुगर कारखान्यांचे अध्यक्ष तानाजी सावंत यांना एफआरपी दिली की नाही असा प्रश्न विचारला.त्यावर संपूर्णपणे रक्कम दिली असे त्यांनी सांगितले. दरम्यान सावंत यांनी शेट्टी यांच्याशी सुध्दा मोबाईलवरून संवाद साधला. एफआरपी मिळाली नसल्याच्या शेतक-यांच्या तक्रारी आहेत, शेट्टी यांनी सांगितले.त्यावर मी शिवसेनेचा नेता असून दहा कारखान्यांचा चेअरमन आहे. एफआरपी दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत एफआरपी विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ. असे सावंत शेट्टी यांना म्हणाले.त्यानंतर शेट्टी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेणा-या सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करण्याची मागणी केली. तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालयातून उठणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली होती. त्यानंतर, आमदारा तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ -