Chandrakant Khaire : "ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू"; शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 15:27 IST2022-09-05T15:17:06+5:302022-09-05T15:27:31+5:30
Shivsena Chandrakant Khaire And BJP Amit Shah : शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrakant Khaire : "ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू"; शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार
मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (BJP Amit Shah) सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. याला आता शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"ते काय जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू" असा पलटवार शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Shivsena Chandrakant Khaire) यांनी "उद्धव ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही. शिवसेनाला कोणीच संपवू शकलं नाही, तुम्ही नष्ट व्हाल पण शिवसेना संपणार नाही. ते काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच जमीन दाखवू. अमित शाह यांनीच शब्द फिरवला. शाह यांच्यासारख्या व्यक्तीने खोटं बोलणं चुकीचं" असं म्हणत निशाणा साधला आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
अमित शाह यांनी भाजपाने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपाचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत आलेत. परंतु मुंबईचं महत्व कसं कमी होईल? मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचं. मुंबईतील अनेक कार्यालयात अहमदाबादला नेले. याचा अर्थ मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु महाराष्ट्राने सातत्याने यावर मात केली आहे असं शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.