"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 23:19 IST2026-04-03T23:02:13+5:302026-04-03T23:19:23+5:30
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.

"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
नाशिकचा कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॉल रेकॉर्ड्सचा हवाला देत केलेल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या आरोपांना मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात १७७ वेळा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशोक खरातला १७ फोन केल्याचे पुराव्यांमध्ये दिसत आहे. हे कॉल नेमके कशासाठी केले? असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांच्या आरोपावर मंत्री उदय यामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचं फोनवर बोलणं झालंय, त्यांनी अशोक खरातच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. आता त्याने या नेत्यांशी बोलणं झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केलं आहे. मात्र ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे, असेही उदय समांत म्हणाले.
गॅसबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एमएनजीएल गॅसचा पुरवठा जाणीवपूर्वक केला जात नसेल तर कडक कारवाई करु असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएल गॅस देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.पण जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण होत असेल तर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल असेही सामंत म्हणाले.
शिंदेसेना मेळाव्यासाठी कॅबिनेट मंत्री उदय सामंत पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी एमएनजीएल हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरविण्यास दिरंगाई करतंय? असा प्रश्न विचारला. त्यावर उदय सामंत म्हणाले, 'मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ च्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने नागरिकांना दैनंदिन वापरासाठी १०० टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तर व्यावसायिक वापरासाठी ८० टक्के पुरवठा करण्याचे निर्देशित केले आहे. इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. अशात भारतावर देखील या युद्धाचा परिणाम होत आहे. एलपीजी गॅस पुरवठ्यात घट झाल्यानंतर आता पाईपलाईन गॅसमध्येही कपात झाल्यानं हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, मेस तसेच इतर व्यावसायिक यांना दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळं व्यावसायिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. एमएनजीएलला गॅस पुरवठ्याबाबत सूचना केल्या आहेत. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. '