शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष
By यदू जोशी | Updated: January 25, 2020 06:37 IST2020-01-25T06:34:03+5:302020-01-25T06:37:47+5:30
आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत...

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष
- यदु जोशी
मुंबई : ‘आदित्यला सांभाळा’ असे भावनिक आवाहन करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १० ऑक्टोबर २०१० रोजी दसरा मेळाव्यात नातू आदित्य यांना राजकारणात आणले. त्याच्या सव्वातीन वर्षे आधी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्याने ठाकरे घराण्यातील फूट उघड झाली होती. पुढील काळात उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत.
बाळासाहेबांच्या आशीर्वादाने व वडील उद्धव यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले असताना आदित्य राजकारणात आले. त्यांचा प्रवेश हा सुकर होता आणि त्यांना भक्कम पाठबळ होते. लाखो शिवसैनिकांची फौज सोबत होतीच. मात्र, मनसेचा पूर्वीसारखा प्रभाव राहिलेला नसताना, राज यांच्या नेतृत्व व भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागलेले असताना म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीत अमित यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे. आदित्य यांच्या तुलनेने त्यांचा राजकीय प्रवास खडतर असेल. आदित्य हे मिळालेले नेतृत्व सिद्ध करीत आहेत, तर अमित यांना ते नेतृत्वासाठी सक्षम असल्याचे सिद्ध करायचे आहे.
२९ वर्षीय आदित्य हे अविवाहित आहेत. २७ वर्षीय अमित यांचा विवाह गेल्या जानेवारीत पाच वर्षांपासूनची मैत्रीण मिताली बोरुडे हिच्याशी झाला. मितालीचे वडील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहेत. आदित्य राजकारण प्रवेशानंतर पक्षात अधिक सक्रिय झाले. युवासेनेचे प्रमुख झाले. विविध आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला. अमित यांना राजकारणात आणण्यापूर्वी राज यांनी त्यांना मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबईत फिरून मनसैनिक, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला पाठविले. मुंबईतील मनसेच्या जवळपास प्रत्येक शाखेत जाऊन त्यांनी संवाद साधला.
अमित यांच्या राजकारण प्रवेशाची मनसेच्या अधिवेशनात घोषणा होताना राज ठाकरे अधिवेशनात होते, पण त्यांनी व्यासपीठावर जाण्याचे टाळले. आदित्य यांचे लहान बंधू तेजस हे लवकरच राजकारणात सक्रिय होतील अशी शक्यता आहे. बहुदा युवासेनेचे प्रमुख केले जाईल, अशी चर्चा आहे. अमित यांच्या बहीण उर्वषी या चित्रपट दिग्दर्शन, फॅशन डिझायनिंग यात करिअर घडवू पाहत आहेत. आदित्य यांच्या पाठीशी उद्वव यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई रश्मी ठाकरे भक्कमपणे उभ्या असतात. अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे या त्यांच्या राजकारण प्रवेशावेळी हजर होत्या आणि अमित पक्षाचे नेतेपद स्वीकारत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अमितची तुलना मला कोणाशीही करायची नाही, त्याने लोकसेवा करीत राहावी, एवढीच इच्छा आहे, अशी नम्र प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.
दोघांमधील साम्य : नम्र स्वभाव, लोकसंग्रहाची आवड, राज्यापुढील प्रश्न जाणून घेण्याची इच्छा.
शिवसेना असो की मनसे, दोघांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असेल. दोन वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य विरुद्ध अमित असा संघर्षही बघायला मिळू शकेल. त्यापूर्वी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अमित यांना सक्रिय केले जाईल. काल त्यांनी नेतेपद स्वीकारल्यानंतर जाणवलेली बाब म्हणजे, अमित यांना भाषण, सभाधीटपणा याची तयारी करावी लागेल. त्याबाबत आदित्य पूर्ण तयार नसले तरी उजवे आहेत.
संवादाचा दरवाजा उघडला
आदित्य हे वडिलांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. आधी मातोश्रीवर आणि आता मंत्रालयात थेट उद्धव ठाकरेंना भेटणे शक्य नसेल तर लोकांना आदित्य यांचा पर्याय असतो. राज यांच्याशी बोलताना आम्हाला बरेचदा दडपण येते, पण अमित यांच्याशी सहज बोलता येते. त्यामुळे संवादाचा दरवाजा आमच्यासाठी उपलब्ध झाला अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाºयाने दिली.