मुंबई : भाजपाचे मंत्री हे शिवसेनेच्या आमदारांची कामे करीत नसल्याची गंभीर दखल घेत या बाबत भाजपाला एक महिन्याचा अल्टिमेटम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. प्रसंगी वेगळा निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.शिवसेनेच्या प्रतोदांनी गेल्या आठवड्यात ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजपाच्या मंत्र्यांकडून शिवसेनेच्या आमदारांचे कसे खच्चीकरण सुरू आहे, याचा पाढाच वाचला होता. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्रीही आपल्या आमदारांची दखल घेत नाहीत, असा तक्रारीचा सूर लावला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आज शिवसेनेचे सर्व मंत्री आणि प्रतोदांना मातोश्रीवर बोलावून घेत दोन तास चर्चा केली. युतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी भाजपावर आहे आणि ती पाळली जात नसेल तर तुमच्या सगळ्यांशी चर्चा करून प्रसंगी वेगळा निर्णय घेऊ. सध्या मी भाजपाच्या मंत्र्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम देतो, असे ठाकरे म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सर्व आमदारांची त्यांच्याबरोबर लवकरच बैठक घेऊ, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. गेली दोन दिवस आपल्या मुखपत्रातून उद्धव ठाकरे हे केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे मंत्री यांच्यात समन्वयाची जबाबदारी मुंबईतील आमदार सुनील प्रभू यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. (विशेष प्रतिनिधी)आपल्या माणसांची कामे करा : मंत्र्यांना तंबीशिवसेनेचे मंत्रीच शिवसेनेच्या आमदारांची कामे करीत नाहीत, अशी गंभीर तक्रार पक्षाच्या प्रतोदांनी गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंकडे केली होती. आज मंत्री आणि प्रतोदांच्या बैठकीत उद्धव यांनी आज मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘मंत्रीपद शोभेसाठी दिलेले नाही. आपल्या आमदारांची कामे होत नसतील तर मंत्रीपद काय कामाचे, असे खडे बोल त्यांनी मंत्र्यांना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.
...तर शिवसेना वेगळा निर्णय घेईल ! - उद्धव
By admin | Updated: July 26, 2016 01:42 IST