'...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:36 AM2023-06-05T08:36:47+5:302023-06-05T08:38:21+5:30

संरक्षण कवचाचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ वगैरे नव्हता, तर मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती असे कोणी म्हटले तर? ठाकरे गटाचा सवाल.

shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets modo government over odisha railway accident suraksha kavach vande bharat | '...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

'...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

googlenewsNext

ओडिशात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. तर दुसरीकडे जखमींवर उपचार सुरू आहे. दरम्यान, या अपघातावरून अनेक प्रश्न उपस्थित झालेत. तसंच या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्नही आता विचारला जातोय. यावरून ठाकरे गटानं आता सामनाच्या संपादकीयमधून जोरदार निशाणा साधलाय.  

'मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचा विकास आणि सुरक्षितता यासंदर्भात जे दावे ठोकले जात आहेत, त्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही दुर्घटना आहे. बुलेट ट्रेन, ‘वंदे भारत’ ट्रेन्स असे रेल्वे विकासाचे बरेच फुगे गेल्या सहा-सात वर्षांत हवेत सोडले गेले. त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली आहे,' असे म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय.

काय म्हटलेय संपादकीयमध्ये?
दोन रेल्वेंमध्ये टक्कर होऊ नये यासाठी ‘संरक्षण कवचा’चा उदोउदो रेल्वेमंत्र्यांनी गेल्या वर्षी केला होता. हे संरक्षण कवच म्हणजे रेल्वे दुर्घटना रोखणारी मोठी क्रांती (भक्तांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’) असून एकाच रेल्वेमार्गावर समोरासमोर ट्रेन्स आल्या तरी या संरक्षण प्रणालीमुळे त्या आधीच थांबतील आणि टक्कर टळेल असे सांगितले गेले होते. स्वतः रेल्वेमंत्र्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मग तरीही शुक्रवारची भीषण रेल्वे दुर्घटना घडलीच कशी?, असा सवाल यातून करण्यात आलाय.

'कुठे गेलं संरक्षण कवच?'
दोन नव्हे, तर तीन-तीन रेल्वेगाडय़ांची टक्कर येथे झाली. कुठे गेले तुमचे ते ‘संरक्षण कवच’? जनतेला दाखविलेली ही ‘कवचकुंडले’ फक्त रेल्वेमंत्र्यांनी प्रात्यक्षिक दाखविलेल्या रेल्वे गाड्यांनाच होती, असे आता म्हणायचे का? या संरक्षण कवचाचा वापर टप्प्याटप्प्याने वाढवत नेला जाईल, या तुमच्या आश्वासनाचे काय झाले? अपघातग्रस्त गाडय़ांना ती प्रणाली असती तर कदाचित शुक्रवारची भयंकर दुर्घटना टळली असती आणि अनेकांचे प्राण वाचले असते. संरक्षण कवचाचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ वगैरे नव्हता, तर मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती असे कोणी म्हटले तर त्यावर सरकारकडे काय उत्तर आहे?,' असेही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.

'जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही'
सुरक्षित रेल्वे प्रवासाचा वादा करणाऱ्या मोदी सरकारच्या पह्ल ठरलेल्या दाव्यांनी घेतलेले हे बळी आहेत. त्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल. तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा घसरलेले डबे यावर खापर फोडून सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. अपघात हा अपघात असतो असे म्हणून हातही वर करता येणार नाहीत. पंतप्रधानांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, जखमींची विचारपूस केली, सांत्वन केले, मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना धीर दिला, हे सगळे ठीक असले तरी सरकार म्हणून तुमच्या उत्तरदायित्वाचे काय? असा सवाल करण्यात आलाय.

Web Title: shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets modo government over odisha railway accident suraksha kavach vande bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.