Maharashtra Politics: “RSSला सावरकरांचे हिंदुत्व मान्य नव्हते, बाळासाहेबांनी त्यांचे विचार पुढे नेले”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 13:32 IST2023-04-02T13:32:11+5:302023-04-02T13:32:38+5:30
Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे. मग आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे दाढी काढणार का, असा सवाल संजय राऊतांनी केला.

Maharashtra Politics: “RSSला सावरकरांचे हिंदुत्व मान्य नव्हते, बाळासाहेबांनी त्यांचे विचार पुढे नेले”: संजय राऊत
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा देशभर गाजताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिंदे गट चांगलेच आक्रमक झाला असून, राज्यभरात आता सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नव्हते, असा दावा केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सावरकर आणि संघाचे विचार भिन्न आहेत. संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार कसे नेणार? आम्ही सावरकरांचे हिंदु्त्व स्वीकारले. सावरकरांना शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नव्हते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नव्हते. बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले. सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा आहे. या सभेला उद्धव ठाकरे पोहोचतील. संभाजीनगरातील महत्त्वाचे नेते असतील. मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही सभेला येतील. ही महाविकास आघाडीची सभा आहे. उगाच व्यासपीठावर गर्दी नको. लोक प्रमुख लोकांची भाषणे ऐकायला येणार आहे. आजच्या सभेला प्रचंड गर्दी होईल अशी शक्यता आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, भाजपवाले गायीला गोमाता म्हणतात. पण सावरकरांना ते मान्य नव्हते. गाय ही एक उपयुक्त पशू आहे, असेच त्यांचे म्हणणे होते. तसेच सावरकरांना दाढी वाढवणे आवडत नसे. मग मिंदे डॉ. एकनाथ शिंदे दाढी कापणार का, असा थेट सवाल संजय राऊतांनी यावेळी केला. तसेच तुम्ही सावरकरांचे साहित्य तुम्ही वाचले आहे का, सावरकर यात्रा काढण्यापूर्वी सावरकरांच्या साहित्याचे पारायण करावे, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"