Maharashtra Politics: “पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 15:49 IST2023-01-20T15:46:13+5:302023-01-20T15:49:25+5:30
Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही उद्घाटन केले, ती सगळी कामे उद्धव ठाकरेंनी केलेली आहेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Maharashtra Politics: “पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे”; मुंबई दौऱ्यावरुन ठाकरे गटाची टीका
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर होते. मुंबईतील विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. विकासकामांवरुन शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसने श्रेयवादाचे राजकारणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच ठाकरे गटातील एका नेत्याने पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर टीका करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा देशातून संपत चालली आहे, असा दावा केला आहे.
माजी खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांची संपूर्ण देशातून हवा संपत चालली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या सभेत पाच मुख्यमंत्री आणि अनेक पक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे २०२४ ला नरेंद्र मोदी यांना मोठा राजकीय फटका बसणार आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा
भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधानांचा मुंबई दौरा हा ठरवून काढलेला दौरा आहे. कारण आगामी काळात मुंबई महानगरपालिकच्या निवडणुका असल्याकारणाने मतदार भुलवण्यासाठीच नरेंद्र मोदी मुंबईत आले, या शब्दांत खैरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून केले जात आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कोणतेही यश येणार नाही. मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांनी जे काही उद्घाटन केले, ती सगळी कामे उद्धव ठाकरे यांनी केलेली आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना कुठलेही यश येणार नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसू शकतो अशी चर्चा, कुजबुज सुरू आहे आणि चर्चा, कुजबुज हे कुठेतरी सत्य असल्याशिवाय होत नाही. फार मोठा धक्का बसणार आहे. आमच्यासोबत कोण खासदार, आमदार आहेत हे सगळे तुम्हाला लवकरच कळणार आहे, असा दावा शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"