Rohit Pawar BJP: "आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा..."; भाजपाचा रोहित पवारांना सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 20:09 IST2022-10-09T20:08:32+5:302022-10-09T20:09:26+5:30
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून रंगला शब्दांचा सामना

Rohit Pawar BJP: "आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा..."; भाजपाचा रोहित पवारांना सणसणीत टोला
Rohit Pawar BJP: शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला. तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही गटांना धक्का बसला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी एक ट्वीट केले. त्यांच्या त्या प्रतिक्रियेनंतर भाजपाकडून त्यांच्यावर सणसणीत टीका करण्यात आली.
रोहित पवारांची प्रतिक्रिया आणि भाजपाचे उत्तर-
"शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही. दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल, त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल," असे रोहित पवारांनी ट्विट केले होते. त्यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांनी सणसणीत टोला लगावला. "आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा, बापाच्या जीवावर उड्या मारणाऱ्याला दिलासा देतोय..." असे ट्वीट त्यांनी केले.
आजोबांच्या जीवावर उड्या मारणारा, बापाच्या जीवावर उड्या मारणाऱ्याला दिलासा देतोय... pic.twitter.com/oCi7I4P1yC
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 9, 2022
दरम्यान, शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या गटावर आणि प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचे नावही संपले आणि चिन्हही. कालाय तस्मै नमः” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे. जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब, भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे. ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल.” असंही देशपांडे म्हणाले.