बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 07:43 AM2020-01-10T07:43:44+5:302020-01-10T07:52:58+5:30

नागपूर जिल्हा परिषदेतील पराभवावरुन देवेंद्र फडणवीसांचा समाचार

shiv sena slams devendra fadnavis over bjp's poor performance in zilla parishad election | बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली; जिल्हा परिषद निवडणूक निकालावरुन शिवसेनेचे भाजपावर बाण

Next

मुंबई: राज्यातील सत्ता हेच भाजपचं 'टॉनिक' होतं. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेनेनं जिल्हा परिषदा निवडणुकीतील पराभवावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. नागपूर जिल्हा परिषदेतीलभाजपाच्या पराजयावरुन शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या 'बकवास' थापेबाजीला कंटाळली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले आहेत. 

'जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील 'मेकअप' उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांत निवडणुका झाल्या. त्यात धुळ्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली. येथे शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या असत्या तर भाजप येथेही गटांगळ्या खाताना दिसला असता. मावळत्या जिल्हा परिषदेत शिवसेनेची पाटी कोरी होती. आता चार जागांवर विजय मिळाला. नंदुरबार जिल्ह्यात भाजप - काँग्रेस 23-23 असे लोक निवडून आले. येथेही शिवसेनेचा तक्ता कोरा होता. आता सात जागांवर शिवसेना विजयी झाली. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय नंदुरबार जिल्हा परिषदेत कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही. नंदुरबारमध्येही काँग्रेसने थोडे हुशारीने घेतले असते व शिवसेनेसह महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले असते तर जिल्हा परिषदेतून भाजपचे नामोनिशाण मिटले असते,' अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे.

Exclusive: नागपूर जिल्हा परिषद का गमावली?; फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

'नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली. मुळात नंदुरबारसारख्या जिल्ह्यात भाजपचे स्वतःचे असे काही स्थान नाही. राष्ट्रवादीतले विजयकुमार गावीत व इतर 'उपरे' घेऊन त्यांनी जी उधार-उसनवारी केली त्यामुळे तेथे भाजपचे झेंडे लागले. पण कालच्या निवडणुकांतून सत्य काय ते बाहेर आले. मुंबईजवळील पालघर जिल्हा परिषदेतून भाजपची सत्ता गेली आहे. शिवसेनेने येथे आधीचाच आकडा 18 हा कायम ठेवला, पण भाजप 21 वरून 12 वर घसरला. भाजप घसरल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला व राष्ट्रवादी 4 वरून 14 वर गेली. अकोल्यात वंचित आघाडी, तर वाशीमला राष्ट्रवादीस बऱया जागा मिळाल्या आहेत. या सर्व जिल्हा परिषदांवर कालपर्यंत भाजपची सत्ता होती, पण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या,' अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

Exclusive : ...तर सगळं वाईटच होतं, राज ठाकरेंच्या भेटीवरुन नवाबांचा फडणवीसांना टोला

नागपुरमधील पराभवावरुन शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचा जोरदार समाचार घेतला आहे. 'नागपूर जिल्हा परिषदेत फडणवीस व गडकरी यांच्या नाकावर टिच्चून काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या 'बकवास' थापेबाजीला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारलीच होती व आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली. नागपुरातील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? नागपुरात 58 पैकी 40 जागांवर काँग्रेस - राष्ट्रवादीने विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे 'टॉनिक' होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे. जिल्हा परिषदांचा कौल स्पष्ट आहे. सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. भाजप आता काय करणार?', असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

Web Title: shiv sena slams devendra fadnavis over bjp's poor performance in zilla parishad election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.