“गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:47 IST2025-02-13T19:44:34+5:302025-02-13T19:47:45+5:30
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदे नेतृत्वात काम करण्याची मानसिकता तयार होत चालली आहे. आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन काही फायदा नाही. संजय राऊतांच्या नादी लागल्याने भविष्यात उद्धव ठाकरे एकाकी पडतील.

“गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका?
Shiv Sena Shinde Group News: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक जण शिवसेना शिंदे गटात सामील होत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली असली, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते, असे सांगितले जात आहे. राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावरून ठाकरे गटातील नेत्यांनी टीका केली. या टीकेला शिवसेना शिंदे गट तसेच महायुतीतील नेते पलटवार करत आहेत.
आम्ही गुहाटीला गेलो, त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले. त्यांना संधी दिली होती, मात्र त्यांनी आपण निष्क्रिय आहोत, हेच महाराष्ट्राला दाखवून दिले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे, हे राजन साळवी यांना समजले म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला. येत्या सहा महिन्यात ठाकरे गटामध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही. टप्प्याटप्प्याने सगळेच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करतील. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळे भविष्यात ते एकाकी पडतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केला.
शरद पवार हे राजकारणातील विद्यापीठाचे कुलगुरू
संजय राऊत हा सकाळचा भोंगा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्लज्जम सदासुखी ही बिरुदावली फक्त आणि फक्त संजय राऊत यांनाच शोभून दिसते. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चांगले उदाहरण म्हणून याकडे पाहणे गरजेचे होते. दुर्दैवाने संजय राऊत यांनी या कार्यक्रमाकडे अतिशय खालच्या नजरेने पाहिले. शरद पवार हे राजकारणातील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. संजय राऊत हा राजकारणातील अंगणवाडीत खेळणारा वात्रट पोरगा आहे, असा खोचक टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला.
दरम्यान, आता ठाकरे गटात हम दो आणि हमारे दो राहतील. विनायक राऊत आणि संजय राऊत हे पिसाळलेले लोक आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील यश पचत नाही. ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदे नेतृत्वात काम करण्याची मानसिकता होत चालली आहे. त्यांना थोपवण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले. परंतु आता त्याचा काही उपयोग होणार नाही. आदित्य ठाकरे हे मोकळ्या हाताने दिल्लीतून मुंबईला परत येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे.