“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:05 IST2025-11-05T15:01:14+5:302025-11-05T15:05:42+5:30
Shiv Sena Shinde Group MP Shrikant Eknath Shinde News: विधानसभेला मिळाले तसेच यश आम्हाला नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला.

“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
Shiv Sena Shinde Group MP Shrikant Eknath Shinde News: शेतकऱ्यांची फसवणूक केली, ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट, तेच टेप लोकांना दररोज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही. मराठवाड्यात शेतकरी नुकसान झाले महायुती सरकारने मदत ही केली, उद्धव ठाकरेंचा हा दौरा निवडणुकीसाठी आहे. हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी शेतकऱ्यांना काय दिले, अशी विचारणा शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, ओला दुष्काळ झाला तेव्हा ३६ हजार रुपयांचे पॅकेज या सरकारने दिले. या अगोदर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून मदत देण्याचे काम आमच्या सरकारनेच केले. ज्यांनी काहीच केले नाही ते आज शेतकऱ्यांना येऊन बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यांच्याबरोबर कोण उभे आहे, या शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला.
या दौऱ्याबद्दल काय म्हणायचे हे त्यांना विचारा
शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे विधानसभेला शेतकरी आमच्या मागे उभे राहिले. म्हणून महायुती सरकार पुन्हा निवडून आले. या दौऱ्याबद्दल काय म्हणायचे हे त्यांना विचारा, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा 'दगाबाज रे' शेतकरी संवाद दौरा सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
दरम्यान, महायुतीची निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. आमची शिवसेनेची तयारी सुरू असून बैठका होत आहेत. वैजापूर, दहिसरमध्ये पक्षाचा कार्यक्रम आहे. निवडणुका जाहीर झाल्या, पहिल्या नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील. विधानसभेला यश मिळाले होते, तसेच यश आम्हाला या निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.