“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:09 IST2025-06-30T18:04:39+5:302025-06-30T18:09:15+5:30
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून संजय पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ असल्याचे म्हटले जात आहे.

“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला पडलेले खिंडार अधिकच विस्तारत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना, ठाकरे गटातीलच अनेक जण नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूर येथील ठाकरे गटातील बडे नाव उपनेते, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, शिवसेना शिंदे गटातील एका नेत्यांनी संजय पवार यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपासून जिल्हाप्रमुख नेमणुकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो, तरी गेली ३६ वर्षे ‘मातोश्री‘वर श्रद्धा ठेवून काम केले. येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार आहे. गेली ३६ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पवार यांची ओळख आहे. पक्षातून सातत्याने होत असलेल्या अवहेलनेमुळे ते काहीसे अस्वस्थ होते. पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी संजय पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना सूचक भाष्य केले.
संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू
पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे संघटन कौशल्य आहे. अशा व्यक्तीवर अन्याय करणे, अप्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही निघून जा, असे सांगणे योग्य नाही. अजून आमची संजय पवार यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण, संजय पवार यांच्यासारखी एखादी चांगली व्यक्ती आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत येत असतील, तर नक्कीच आम्ही त्यांचे स्वागत करू. प्रत्येक वेळी जातात त्यांना जाऊ दे म्हणायचे, बाकीच्यांचा अपमान करायचा, त्यांची बदनामी करायची. त्या लोकांना नावे ठेवायची, हाच उद्योग त्यांचा सुरू असतो. म्हणूनच ठाकरे गटातील सर्व मंडळी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेत आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते. संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती. पण, शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला. त्यातून युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला. सामान्य शिवसैनिक ते उपनेते पद देत असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे उपाध्यक्षपद, राज्यसभेची उमेदवारी देऊन सन्मान केला. पक्षाने आपणाला खूप दिले, पण ज्या पध्दतीने निर्णय घेताना पक्षाकडून वागणूक मिळते, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.