गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 22:31 IST2025-04-11T22:28:53+5:302025-04-11T22:31:52+5:30

Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

shiv sena shinde group mahendra dalvi said bharat gogawale should be the guardian minister of raigad | गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”

Shiv Sena Shinde Group News: एका बाजूला विरोधक महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करत असून, दुसरीकडे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेला तिढा अद्याप संपलेला दिसत नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत अंतर्गत धुसपूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर येणार असून, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहे. अमित शाह यांच्या भेटीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे. 

रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पहिल्यापासून शक्तिप्रदर्शन करत आक्रमक भूमिका घेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे हेही अदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे, म्हणून आग्रही आहेत. असे असतानाच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा इशारा दिला आहे. 

गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह

आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. अमित शाह हे रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. तसेच अमित शाह हे खासदार तटकरे यांच्याकडे भोजनाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मात्र, बंद दाराआड चर्चा करण्याची काही गरज आहे असे वाटत नाही. कारण आम्ही सर्वच रायगडवासीय आशावादी आहोत की भरत गोगावले यांच्या रुपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल. आम्ही सर्वजण आशावादी आहोत की, आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. पण जर असे घडले नाही तर रायगडची परंपरा आहे की, रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा रायगडमधून उठाव होतो आणि मग परिवर्तन होते. हे देशाने आणि राज्याने पाहिले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असे दळवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खरे तर खूप उशीर झाला आहे. मागच्या परिवर्तनात रायगडचा इतिहास हा सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा भरत गोगावले हे कदाचित मंत्री झाले असते तर ते पालकमंत्री नक्कीच झाले असते. कारण भरत गोगावले हे चार टर्मचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो. सुनील तटकरे यांचा हव्यास असला तरी रायगडची जनता हे स्वीकारणार नाही, असेही दळवी यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: shiv sena shinde group mahendra dalvi said bharat gogawale should be the guardian minister of raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.