एकटे आम्हीच लढतोय! राष्ट्रवादीच्या 'सॉफ्ट' भूमिकेवर शिवसेना नाराज; मुख्यमंत्री थेट पवारांशी बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:43 AM2022-03-31T08:43:39+5:302022-03-31T08:45:42+5:30

राष्ट्रवादीनं केव्हा केव्हा नरमाईची भूमिका घेतली?; शिवसेना नेत्यानं यादीच वाचली

Shiv Sena sees NCP as being ‘soft’ on BJP cm Uddhav thackeray takes it up with sharad Pawar | एकटे आम्हीच लढतोय! राष्ट्रवादीच्या 'सॉफ्ट' भूमिकेवर शिवसेना नाराज; मुख्यमंत्री थेट पवारांशी बोलले

एकटे आम्हीच लढतोय! राष्ट्रवादीच्या 'सॉफ्ट' भूमिकेवर शिवसेना नाराज; मुख्यमंत्री थेट पवारांशी बोलले

Next

मुंबई: महाविकास आघाडीमधील कुरबुरी कायम आहेत. एका बाजूला काँग्रेसचे २५ आमदार नाराज असताना आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर समाधानी नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेना अतिशय आक्रमकपणे अंगावर घेत असताना राष्ट्रवादीनं नरमाईची भूमिका घेतल्यानं शिवसेनेत नाराजी आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोलून दाखवल्याचं वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असताना राष्ट्रवादीनं मात्र नरमाईची भूमिका घेतल्याचं शिवसेना नेत्यांना वाटतं. राष्ट्रवादीनं भाजपविरोधात कधी कधी 'सॉफ्ट' भूमिका घेतली, त्याची उदाहरणंच शिवसेनेतील सुत्रांनी दिली आहेत.

- १३ मार्चला मुंबई पोलिसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसीतील मुंबई पोलिसांच्या सायबर विंगमध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्यानंतर गृह मंत्रालयानं अचानक निर्णय बदलला. पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या निवासस्थानी गेले. शिवसेना नेत्यांना ही बाब खटकली. गृह मंत्रालय ज्याप्रकारे पोलीस दल हाताळत आहे, त्याबद्दल शिवसेना समाधानी नाही. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे.

- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली. त्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर तोफ डागू लागले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं विधान शिवसेनेला रुचलेलं नाही. 'दोन्ही बाजूंनी शांत व्हावं आणि परिस्थिती हाताबाहेर जायला देऊ नये,' असं पवार म्हणाले होते. शिवसेनेला अजित पवारांकडून आक्रमक पवित्रा अपेक्षित होता. मात्र तसं झालं नाही.

- गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं. तालिका अध्यक्षांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यावर अजित पवारांनी घेतलेली भूमिका शिवसेनेला पटली नाही. आमदारांना काही तास किंवा दिवसांसाठी निलंबित केलं जाऊ शकतं. पण १२ महिन्यांचा कालावधी जास्त असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं.

- २८ मार्चला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. 'मोदींना लोकांनी कौल दिला आहे. त्यांच्यात काही तरी चांगले गुणे असावेत किंवा ते चांगली कामं करत असावेत. मात्र ती विरोधकांना शोधता येत नसावीत,' असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

लढाई आम्हीच लढतोय, राष्ट्रवादी बॅकफूटवर
'भाजपविरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत. पण राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रकारे भाजपशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही,' असं शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यानं एक्स्प्रेसला सांगितलं.

भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून सातत्यानं मविआच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात असताना पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित काम होताना दिसत नसल्याचं शिवसेनेतील सुत्रांनी सांगितलं. तर आम्ही भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पण शिवसेनेच्या काही नेत्यांना राष्ट्रवादीनं आणखी आक्रमक व्हावं असं वाटतं. कारण गृह मंत्रालय आमच्याकडे आहे, असं राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीशरद पवारांना सांगितलं आहे. मविआनं आक्रमकपणे भाजपचा सामना करावा असं खुद्द शरद पवारांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील, अशी आशा सेना नेत्यानं व्यक्त केली.
 

Web Title: Shiv Sena sees NCP as being ‘soft’ on BJP cm Uddhav thackeray takes it up with sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.