Rajeev Satav: राजीव, तू हे काय केलेस, तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक; संजय राऊत भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 11:18 IST2021-05-16T11:17:46+5:302021-05-16T11:18:36+5:30
Rajeev Satav: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Rajeev Satav: राजीव, तू हे काय केलेस, तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक; संजय राऊत भावूक
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात गेल्या २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सातव यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. अखेर सातव यांची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त काँग्रेसकडून देण्यात आले. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (shiv sena sanjay raut mp rajeev satav sad demise twitter)
राजीव यांच्या अचानक जाण्यामुळे काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केले आहे. राजीव सातव तू हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे. चार दिवसापूर्वीच व्हिडीओ कॉलवर आपण नि:शब्द हाय, हॅलो केले. लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे. तुला कोणत्या शब्दात श्रध्दांजली वाहू?, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2021
चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..
तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? pic.twitter.com/dR0txA7JkS
उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त: पवार
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
लस हाच उपाय, भारतात ‘इतक्या’ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक; तज्ज्ञांचे मत
जगन्मित्र हरपला: अजित पवार
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावले: पाटील
सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.