पिंपरी : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा भाजपा आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या भावाने आपल्या कुटूंबातील लहान मुलांना भर उन्हात उभे केले. आमदारांच्या भावाने लहान मुलांसह केलेल्या आंदोलनाचा फोटो चांगलाच ट्रोल झाला आहे. शिवसेनेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आदी नेत्यांनीही या प्रकाराचा निषेध करीत भाजपाच्या नेत्यावर टीका केली आहे.कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने आज (शुक्रवारी) राज्यभरात ठिकठिकाणी ''मेरा आंगण, मेरा रणांगण'': महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. राज्यातील अनेक नेत्यांनी सोशल डिस्टंन्सिंग करत आंदोलन केले. तसेच काळ्या रंगाचे मास्क, शर्ट, रिबीन, फलक घेऊन नेत्यांनी सरकारचा निषेध केला. मात्र पिंपरी -चिंचवडमधील भाजपा आमदाराच्या एका भावाने घरातील लहान मुलांना कडकडीत उन्हात उभे करत हे आंदोलन केले. विशेष म्हणजे सोशल काही मुलांनी मास्कही घातले नव्हते. तर दहा वर्षांखालील मुलांना घराबाहेर बंदी असतानाही त्याचे पालन न करता या आंदोलनात सहभाग नोंदविला.
तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हा फोटो ट्विट करत सत्तेसाठी हे लोक आपल्या मुलांचे जीवही धोक्यात घालायला तयार असल्याची टिका केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हा फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या आंदोलनापेक्षा हाच विषय अधिक चर्चेचा ठरला होता.