संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 21:20 IST2022-05-20T21:19:20+5:302022-05-20T21:20:07+5:30
Sanjay Raut : संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे.

संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे तर दुसरीकडे, शिवसेनेकडून संजय राऊत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख ठरली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम संजय राऊत प्रस्थापित करणार आहेत.
संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना नेते म्हणून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर जाणार आहे. याआधी नजमा हेपतुल्ला महाराष्ट्रातून सलग 4 वेळा ( एकूण 6 टर्म ) राज्यसभेवर (1980-2018) निवडून गेल्या आहेत. तर, काँग्रेसकडून सरोज खापर्डे पाच वेळा राज्यसभेवर (72-2000) निवडून गेले आहेत. संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे, त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे.
चार जुलै रोजी हे खासदार होणार निवृत्त
राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे, तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम असे महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या रिक्त जागांसाठी ही निवडणूक आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून चार माजी खासदाराची नावे चर्चेत आहे. चंद्रकांत खैरे, शिवाजी आढळराव पाटील, अनंत गीते आणि आनंदराव अडसूळ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.