सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 19:16 IST2021-10-02T18:00:47+5:302021-10-02T19:16:41+5:30
अनिल परबांविरुद्धचे पुरावे रामदास कदम यांनी सोमय्यांना दिल्याचा आरोप; मनसेनं दिल्या ऑडिओ क्लिप

सोमय्यांच्या मदतीनं रामदास कदमांनी केला अनिल परबांचा गेम?; वाचा फोनवर झालेलं संभाषण
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप करून सोमय्यांनी त्यांना वारंवार अडचणीत आलं आहे. परब यांच्यावर तुटून पडलेल्या सोमय्यांना शिवसेनेच्याच बड्या नेत्याने रसद पुरवल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याशिवाय मनसेच्या नेत्यानं सोमय्या आणि कदम यांच्या ऑडिओ क्लिपदेखील समोर आणल्या आहेत.
प्रसाद कर्वे नावाचा एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.
ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं-
रामदास कदम- हॅलो..
प्रसाद कर्वे- आज पोलीस गुन्हा दाखल केला किरीट सोमय्यांनी..
कदम- क्या बात है.. वाह...
कर्वे- पहिल्या तक्रारीमध्ये सदा अप्पाचं नाव नव्हतं. मग मी तक्रार बदलली. त्यांना बदलायला सांगितली. मी त्यांना सांगितलं, यात सदा अप्पाचं नाव टाका. कारण याचा कर्ताकरविता हाच आहे.
कदम- अच्छा अच्छा..
कर्वे- त्यामुळे सदाचं नाव त्या पोलीस तक्रारीमध्ये टाकलं.
कदम- ओके ओके..
कर्वे- दिल्लीची टीम आलेली आहे..
कदम- कधी आली..?
कर्वे- आली सीआरझेडची..
कदम- कधी आली..
कर्वे- आजच आली.. आता ते दाखवायला गेलेत खाली..
कदम- मेला मग हा.. मेला मेला..
कर्वे- हा हा..
कदम- वाट लागली वाट लागली.. दिल्लीची टीम आली आणि त्यांनी झाडं कापलेली, रस्ता बनवलेला बघितला ना.. मेला मग हा...
कर्वे- हो..
कदम- आणि १०० टक्के सीआरझेडच्या खाली येतंय ते..
कर्वे- होय.. १०० टक्के सीआरझेडमध्ये येतं..
ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदम
मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.