शिवसेनेच्या 'या' नेत्याची मागणी; 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचं चित्रीकरण थांबवा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 02:33 PM2020-02-20T14:33:20+5:302020-02-20T14:47:54+5:30

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती.

Shiv Sena ex-minister Arjun Khotkar Demand of Stop screening 'Swarajya Raksha Sambhaji' serial on Zee Marathi | शिवसेनेच्या 'या' नेत्याची मागणी; 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचं चित्रीकरण थांबवा अन्यथा...

शिवसेनेच्या 'या' नेत्याची मागणी; 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचं चित्रीकरण थांबवा अन्यथा...

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि झी समुहाला भेटून विनंती करणार औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर शिवसेना नेत्याने केली मागणी त्यामुळे खबरदारी वेळीच घेतली पाहिजे - अर्जुन खोतकर

मुंबई - गेल्या काही दिवसापासून झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. औरंगजेबाच्या तावडीत संभाजी महाराजांचे हाल होताना दिसत आहे. मात्र संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल पाहवू शिवप्रेमी पाहू शकत नाही त्यामुळे मालिकेतील चित्रीकरण थांबवा अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. 

याबाबत एबीपी माझाशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, इतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही हे खरं आहे. संभाजी महाराजांचे हाल कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे काही जण यातून खुरापती काढून राज्यातील वातावरण बिघडवू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. म्हणून  त्यातून काही प्रसंग निर्माण होणार असतील तर त्याची खबरदारी वेळीच घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तर लवकरच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि झी समुहाला भेटून विनंती करणार आहे. संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे अशी मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये शरद पवारांच्या दबावामुळे ही मालिका बंद होतेय असं म्हटलं होतं. मात्र याबाबत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणात शरद पवारांना गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असं त्यांनी म्हटलं होतं. 

तसेच ही मालिका सुरुच राहणार आहे, कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होतेय, या बातमीत कुठलंही तथ्य नाही जे कोणी अशा बातम्या पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली होती. राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधत सत्ता मिळवली. त्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळलं अशी टीका होऊ लागली. त्यातच औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेने केलेल्या या मागणीवर विरोधकांकडून नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Shiv Sena ex-minister Arjun Khotkar Demand of Stop screening 'Swarajya Raksha Sambhaji' serial on Zee Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.