“कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 14:13 IST2023-01-22T14:11:21+5:302023-01-22T14:13:28+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे.

“कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्यांना शिवसैनिकांनी भेटणं यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान असू शकत नाही”
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो पदयात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर आता पंतप्रधानपदाबाबत २०२४ नंतर ठरवू. पण जनतेची इच्छा असेल, तर राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हावे लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नाव न घेता संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
“कलम ३७० हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते कलम काश्मीरमधून हटवण्यात आलं. ज्या कलमाचा काश्मीरमध्ये काँग्रेसने पुरस्कार केला होता, त्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेच्या लोकांनी जाऊन भेटणं यासारखा बाळासाहेबांचा अपमान होऊ शकत नाही,” असं केसरकर म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
“आम्ही अनेक ठिकाणी गेल्यानंतर ते गोमुत्र शिंपडून जमीन साफ करतात. त्याऐवजी जे लोक जाऊन आलेत त्यांचं शुद्धीकरण केलं पाहिजे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं, मला एक दिवस मला पंतप्रधान करा, मी ३७० कलम हटवून दाखवतो असं म्हणणारे बाळासाहेब कुठे. सत्तेसाठी काँग्रेसच्या मागून धावणारे आपल्याला शिवसैनिक म्हणवणारे कुठे हा खरा प्रश्न आहे. म्हणून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांसोबत गेलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.