Maharashtra Politics: “मोदी सरकारची जुमलेबाजी, इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 08:47 AM2023-01-25T08:47:36+5:302023-01-25T08:48:33+5:30

Maharashtra News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली.

shiv sena criticised central modi govt over petrol diesel fuel price hike | Maharashtra Politics: “मोदी सरकारची जुमलेबाजी, इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न”

Maharashtra Politics: “मोदी सरकारची जुमलेबाजी, इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न”

Next

Maharashtra Politics: आकाशाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा, अशी मागणी सामान्य जनता आणि विरोधी पक्ष नेहमीच करीत असतात. मात्र ज्यांनी ही दरवाढ रोखायची, ती कमी करायची ते सरकारमधील मंत्रीच ही मागणी करू लागले तर त्याला काय म्हणायचे? जनतेने हसायचे की रडायचे? अशी विचारणा करत महागाई असो की दरडोई उत्पन्नवाढ, शेतकरी असो की बेरोजगार, गरीब असो की मध्यमवर्गीय, धोरण आर्थिक असो की संरक्षणविषयक, मागील आठ वर्षांपासून देशात हवेतली तलवारबाजी आणि जुमलेबाजीच सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. 

पेट्रोलियम मंत्री पुरी यांनीही इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना तरी दोष का द्यावा? या पुंगीवर जनता डोलणार नाही. कारण ही मोदी सरकारची ‘जुमलेबाजी’ आहे, हे जनता ओळखून आहे. इंधन दरवाढ आणि महागाई हा जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याबाबत पतंगबाजी करू नका. नाहीतर जनता तुमच्या सरकारचा कधी ‘कटी पतंग’ करेल, हे तुम्हालाही समजणार नाही!, या शब्दांत इंधनदरवाढीवरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला.

इंधन दरकपातीची सरकारलाच इच्छाशक्ती नाही

इंधन दरकपातीची सरकारलाच इच्छाशक्ती नाही. त्यामुळे उगाच अपेक्षेचे फुगे आकाशात का सोडत आहात? पुन्हा हा अधिकार कंपन्यांचा आहे, असे सांगून अंग काढून घेण्याचा दुटप्पीपणा कशासाठी करीत आहात? इंधन दरांबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडेच बोट दाखविणार असाल तर सरकार म्हणून तुमचा अधिकार काय? अशी प्रश्नांची सरबत्ती शिवसेनेने केली. तसेच ही दरवाढ आणि महागाई कमी होईल, या भ्रमात जनता अजिबात नाही. तेव्हा त्या भ्रमाचा भोपळा जनतेला दाखविण्याचे उद्योग करू नका, असा खोचक सल्ला शिवसेनेने दिला. तसेच मोदी सरकार हे आजपर्यंतचे देशातील सर्वात कणखर वगैरे सरकार असल्याचे तुम्हीच सांगत असता ना, मग इंधन दरकपातीबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडे बोट का दाखवता? सरकार म्हणून द्या दणका या कंपन्यांना, असे आव्हान शिवसेनेने दिले आहे. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत, तुमचा तोटाही भरून निघाला आहे, तरीही इंधन दरकपात का करीत नाही, असा दम भरा आणि इंधनाचे दर कमी करायला भाग पाडा. जनतेला थेट दिलासा द्या, असे आवाहन करत, त्याऐवजी शब्दांचे बुडबुडे का उडवीत आहात? अर्थात, पेट्रोलियम मंत्री तरी काय करणार? ते ज्या सरकारमध्ये आहेत ते सरकार ‘बनवाबनवी’ आणि ‘जुमलेबाजी’ याशिवाय दुसरे काय करीत आहे? असा सवालही शिवसेनेने केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena criticised central modi govt over petrol diesel fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.