Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:25 IST2025-11-18T15:22:03+5:302025-11-18T15:25:05+5:30
Shiv Sena BJP Local Body Elections : कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपने शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेत्यांना पक्षात घेतले. यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेला मंगळवारी तोंड फुटले. शिंदेंचे मंत्री बैठकीलाही गैरहजर होते. या सगळ्या प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले.

Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
"८ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, कार्यकर्ते पदाधिकारी जिथे संधी मिळेल तिथे जात आहेत. यामुळे तिन्ही पक्षात थोडीफार नाराजी तयार झाली असेल, पण शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याचे ते कारण नव्हते", असा खुलासा राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गैरहजर होते. शिंदेंचे मंत्री मंत्रिमंडळ पूर्व बैठकीला होते. पण, नंतर शिंदेंच्याच कार्यालयात बसून राहिले, असे वृत्त काही माध्यमांनी दिले. भाजप शिवसेनेचे नेते फोडत असल्याच्या मुद्द्यावर मंत्री नाराज असल्याच्या चर्चेला यामुळे तोंड फुटले. या प्रकरणावर बावनकुळे यांनी सविस्तर भूमिका मांडली.
मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "कोणीही मंत्री नाराजा नाहीत. एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते. निवडणुकीमुळे शिवसेना, भाजपचे मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय कुणीही गैरहजर नाहीत. मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती."
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. एकनाथ शिंदे फक्त बैठकीला गेले, बाकी सगळे एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात बसून होते, असा मुद्दा काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळेंसमोर मांडला.
आमचे ठरले आहे की एकमेकांचे नेते...
बावनकुळे म्हणाले, "मला वाटत नाही काही असेल. यात चुकीचा समज झाला आहे. कुठेही नाराजी नाहीये. महायुतीमध्ये हे ठरलं आहे की, कोणताही नेता एकमेकांच्या पक्षात जाणार नाही. पण, मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या. काही भाजपमधून एकनाथ शिंदेंकडे गेले. काही अजित पवारांचे काही आमच्याकडे आले."
"देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे तिन्ही नेते एकत्र बसून याबद्दलचा निर्णय घेतील. ही गोष्ट खरी आहे की, आमचे काही माजी लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंकडे गेले आणि एकनाथ शिंदेंचे भाजपकडे आले. काही अजित पवारांकडे गेले. मला असं वाटतं की थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या बैठकीत हे कारण नव्हते", असा खुलासा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
"महायुतीची समन्वय समिती आहे. पक्षातील विषय मंत्रिमंडळ बैठकीत येत नाही. पक्षाच्या मंत्रिमंडळ पूर्व बैठकीमध्येही मंत्रिमंडळ बैठकीत येणाऱ्या विषयांवरच चर्चा होते. राजकीय चर्चा समन्वय समितीमध्येच होते. निवडणुकीमुळे सर्वच पक्षाचे मंत्री आपापल्या भागात व्यस्त आहेत आणि त्यामुळे येऊ शकले नाहीत", असे बावनकुळे यांनी सांगितले.