'सीएम'पदाच्या शर्यतीत सेना 'बॅकफूटवर' ? म्हणाले, जनआशीर्वाद यात्रा अराजकीयच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:05 IST2019-07-31T17:04:10+5:302019-07-31T17:05:33+5:30
आगामी विधानसभा निवडणूक आणि जनआशीर्वाद यात्रेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले. त्यामुळे आदित्य आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून एक पाऊल मागे तर घेतले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'सीएम'पदाच्या शर्यतीत सेना 'बॅकफूटवर' ? म्हणाले, जनआशीर्वाद यात्रा अराजकीयच
मुंबई - भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकत आणि त्यानुसार पक्षातून स्वबळावर लढण्यासंदर्भात सुरू असलेली चाचपणी, शिवसेनेची धाकधुक वाढवणारी आहे. नुकत्याच आलेल्या अंतर्गत सर्व्हेत भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत दाखविण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झालेल्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीच भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती निश्चित झाली होती. विधानसभा निवडणुकीला देखील दोन्ही पक्ष एकत्रच निवडणुकीला सामोरे जातील असं ठरलंही आहे. त्यानुसार २०१४ मध्ये मोठा भाऊ म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेकडून भाजप-सेना जुळे भाऊ असल्याचे सांगण्यात आले. परंतु, मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, असंही शिवसेनेकडून सांगण्यात आले. तर खासदार संजय राऊत यावरच थांबले नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील, असंही जाहीर करून टाकलं. त्यानुसार शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सुरू असल्याचे भासविण्यात आले.
दरम्यान शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे यांची दावेदारी सांगणे भाजपला रुचलेले दिसत नाही. त्यातच भाजपमध्ये होत असलेली इनकमिंग आणि अंतर्गत सर्व्हे यामुळे सेना बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. सर्व्हेत सेना बहुमतापासून दूर दाखविण्यात आली आहे. अशा स्थितीत खुद्द आदित्य ठाकरे यांनीच जनआशीर्वाद यात्रा राजकीय नसल्याचे स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक आणि जनआशीर्वाद यात्रेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले. त्यामुळे आदित्य आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून एक पाऊल मागे तर घेतले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.