...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 05:52 IST2025-07-10T05:51:09+5:302025-07-10T05:52:07+5:30
आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण

...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
मुंबई : शिंदेसेनेचे बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये तेथील कर्मचाऱ्याला गावगुंडाप्रमाणे बेदम मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विधिमंडळातही पडसाद उमटले. सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घ्यावा, अशी शिफारस केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
गायकवाड यांनी मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान कॅन्टीनमधून डाळभात, चपाती आपल्या खोलीत मागवले होते; परंतु हे जेवण खराब असल्याचा आरडाओरड करीत पारा चढलेले गायकवाड खोलीतून तसेच बनियन आणि टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये धडकले आणि त्यांनी जेवण आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचा जाब विचारत शिवीगाळ करीत मारहाण केली.
आमदारसाहेब, हे वागणे तुम्हाला शाेभते का?
आ. गायकवाड त्यांचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्तेचा माज कसा असतो, हेच यातून पहायला मिळते, महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार झाल्यासारखे वाटते, असे लोकांनी म्हटले आहे. आमदार जर खराब जेवणासाठी कॅन्टीनवाल्याला मारहाण करत असेल तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची शिफारस
सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घ्यावी आणि यावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घ्यावा, अशी शिफारस याप्रकरणी विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मी समज दिली आहे : एकनाथ शिंदे
रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केले; पण लोकप्रतिनिधी असताना कायदेशीर कारवाई करण्याचे आपल्याकडे अधिकार आहेत. मी गायकवाड यांना समज दिली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.