मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:35 IST2025-10-27T19:30:03+5:302025-10-27T19:35:48+5:30
राष्ट्रवादीच्या कार्यालयात शिल्पा यांनी केलेले लावणी नृत्य चांगलेच चर्चेत आले आहे.

मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
नागपूर - अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यालयात लावणी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत राष्ट्रवादी पदाधिकारी समोर बसलेले असताना एक महिला मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर डान्स करताना दिसते. या व्हिडिओवरून विरोधकांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संबंधित प्रकरणावर जिल्हाध्यक्षांना नोटीस बजावत ७ दिवसांत खुलासा द्या असं पत्रक काढले. आता संबंधित महिलेने समोर येत त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणाऱ्या या महिलेचे नाव शिल्पा शाहीर असं आहे. त्या नागपूर येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहेत. या व्हिडिओबाबत त्यांनी सांगितले की, मला राष्ट्रवादीकडून दिवाळी मिलन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तिथे मी एक सादरीकरण केले त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मी स्वत: राष्ट्रवादीशी जोडलेली आहे. त्यात रायबा ईमानदार या चित्रपटातील माझी लावणी चर्चेत असताना माझी मैत्रिण रेखा तरडे आणि सुनीता हेरणे यांनी मला कार्यक्रमाला येण्यासाठी आग्रही विनंती केली. त्यांच्या शब्दांना मान देऊन मी या कार्यक्रमाला पोहचली होती असं त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात मराठी गाण्यावर डान्स करणाऱ्या महिलेने दिले स्पष्टीकरण #NCP#AjitPawarpic.twitter.com/ZssOxTdcBA
— Lokmat (@lokmat) October 27, 2025
तसेच या कार्यक्रमाला माझ्यासोबत अनेक महिला होत्या. तिथे महिलांचा सत्कार झाला, त्यात माझाही सत्कार झाला. ज्यांना गाणे म्हणता येते, त्यांनी गाणी म्हटलं, ज्यांना डान्स करता येत होता, त्यांनी डान्स केला. आता मी लावणी कलाकार आहे. सगळीकडे लावणीचे कार्यक्रम घेते. लावणीमुळे माझी ओळख आहे. त्यामुळे मला या कार्यक्रमात छोटीशी लावणी सादर करायला सांगितली, तिथे मी लावणी सादर केली असंही शिल्पा शाहीर यांनी म्हटलं.
कोण आहे शिल्पा शाहीर?
शिल्पा शाहीर या लावणी कलावंत असून नुकतेच रायबा ईमानदार या मराठी चित्रपटातील चहा पाण्याला पाहून बोलवा ना या लावणीत त्यांनी नृत्य सादर केले आहे. लावणी कलावंत म्हणून शिल्पा शाहीर या नागपूर परिसरात प्रसिद्ध आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात शिल्पा यांनी केलेले लावणी नृत्य चांगलेच चर्चेत आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. खासदार सुनेत्रा पवार यांनीही यावर कॉल केला होता. लावणी सादर करण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या कलाकारांना बोलवले गेले नव्हते. पक्षातील कार्यकर्ते दिवाळी मिलनच्या निमित्ताने एकत्र आले होते आणि आपापली कला सादर करत होते, असे अहिरकर यांनी म्हटले आहे.