इंडिया आघाडीत खटके, मविआतही वाद; आता पुढे काय? शरद पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:25 IST2025-01-14T13:21:25+5:302025-01-14T13:25:12+5:30
Sharad pawar on India Alliance News: राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सध्या वादविवाद सुरू झाले आहेत. सुसंवाद पुन्हा सुरू करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत.

इंडिया आघाडीत खटके, मविआतही वाद; आता पुढे काय? शरद पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका
Sharad Pawar News: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीत बिनसल्याचे दृश्य दिसत आहे. महाराष्ट्रातही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे पुढे काय होणार? या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील वादांवर शरद पवारांनी भाष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंडिया आघाडीची सध्या जी स्थिती आहे, त्याबद्दल सामनामधून दररोज काहीतरी लिहिलं जातंय. तुम्ही मध्यस्थी करण्याची गरज आली आहे का? कारण दिल्लीत काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढत आहेत, त्यावर तुमच्या राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.
शरद पवार म्हणाले, "दोन गोष्टी आहेत. इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी आणि आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसलो, त्यावेळी आमचा प्रयत्न देश पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत, त्यामध्ये एकत्र येण्याचा विचार होता. राज्यातील आणि विशेषतः स्थानिक पातळीवरच्या त्या सगळ्या निडवणुकांमध्ये आपण एकत्रित काम करावं, अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही."
इंडिया आघाडीतील समन्वयासाठी शरद पवार पुढाकार घेणार
शरद पवार यांनी सांगितले की, "आता ज्या पद्धतीने वृत्तपत्रांनी त्याची नोंद घेतली. ही नोंद घेतल्याने प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरच्या समस्यांवर आपण एकत्र यायचे, ही जी भूमिका आहे त्यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना निमंत्रित करून केला जाईल", अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
महाविकास आघाडीबद्दल शरद पवार काय म्हणाले?
राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांत शाब्दिक ठिणग्या उडाल्या. मविआबद्दलही पवारांनी भाष्य केले.
"त्या आधी महाराष्ट्रात राज्यापुरतं मर्यादित, इंडिया आघाडीचा संबंध नाही. पण, राज्यापुरतं सीमित येत्या आठ ते दहा दिवसांत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी, जयंतराव पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून, इथे काही वेगळी भूमिका एकत्रित घेता येईल का? याच्याबद्दलचा विचार चालला आहे", अशी माहिती शरद पवारांनी दिली.