पवारसाहेब तुमच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 18:58 IST2023-07-07T18:57:57+5:302023-07-07T18:58:41+5:30
भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती.

पवारसाहेब तुमच्या राजकारणामुळे शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात दुसऱ्यांचा भूकंप आला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीचा मोठा गट सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राने पक्षातील फुटीचे राजकारण पाहिले आहे. यानंतर अजित पवार यांनी शक्तीप्रदर्शन करत शरद पवारांच्या राजकारणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता यावरून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी सध्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. आमच्यासाठी फक्त आणि फक्त शेतकरी हा केंद्रस्थानी असून बाकी राजकारणात आम्हाला पडायचे नाही. सध्या महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे रबिश झालेले आहे, अशी टीका त्यांनी केली.
शरद पवार यांच्याबाबत बोलतानाच शरद पवारांनी आयुष्यभर याचा काटा काढ, त्याचा काटा काढ, याचा गेम कर, त्याचा गेम कर अशा पद्धतीचे राजकारण केले. मात्र त्यांच्या या राजकारणामुळे शेतकऱ्यांचाच गेम झाला आहे. आता कुठेतरी त्यांनी थांबावे, असे जाधव म्हणाले आहेत.