"शरद पवारांनी मला सांगितलं की ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत; मग आता...", खासदार संजय राऊतांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:34 IST2026-02-14T13:32:41+5:302026-02-14T13:34:25+5:30
Sharad pawar Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कालावधी २ एप्रिल रोजी संपत आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ एक खासदार निवडून जाईल इतकेच असल्याने कोणाला राज्यसभेत पाठवणार, याबद्दलची चर्चा सुरु आहे.

"शरद पवारांनी मला सांगितलं की ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत; मग आता...", खासदार संजय राऊतांचे विधान
शरद पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत असून, ते पुन्हा निवडणूक लढवणार की नाही, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. शरद पवार हे पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे राऊतांनी सांगितले. शरद पवारांसोबत माझी भेट झाली होती आणि त्यावेळी त्यांनी हे सांगितल्याचेही राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना राज्यसभा निवडणूक आणि उमेदवाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
राऊत म्हणाले, शरद पवार पुन्हा निवडणूक लढवणार
"एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा विचार करता, तिन्ही पक्षांचा मिळून एकच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. कारण तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून याबद्दल निर्णय घेऊ", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
"माझी मध्यंतरी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. शरद पवार यांना राज्यसभेवर जाण्याच्या विषयाबद्दल मी त्यांचं मत विचारले. तेव्हा शरद पवारांनी मला सांगितलं की, राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत. मग आता यावर महाविकास आघाडीतील तीन पक्षात चर्चा सुरू आहे", असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
'शरद पवारांनी काँग्रेसला याबद्दल सांगितलं आहे'
"शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ६० वर्षांपेक्षा जास्त संसदीय कामाचा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे शरद पवार यांनी जर ही भूमिका व्यक्त केली आहे आणि त्यांची भूमिका त्यांनी काँग्रेसला देखील सांगितली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबद्दल चर्चा होईल", असेही संजय राऊत म्हणाले.