"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:40 IST2025-09-17T14:33:12+5:302025-09-17T14:40:14+5:30

शरद पवार आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. ते भांडणे लावतात, वाद काढता, एकाचवेळी दुतोंडी भूमिका कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावे असं पडळकरांनी म्हटलं.

Sharad Pawar is a factory of conspiracy in Maharashtra"; BJP MLA Gopichand Padalkar criticism | "शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

मुंबई - शरद पवार हे महाराष्ट्रातील कटकारस्थानाचा कारखाना आहे. कारस्थाने कशी रचायची याचा मुख्य कारखाना पवार आहेत. तुम्ही निवडणूक आयोगावर शंका निर्माण करण्याचं पाप करतायेत. ज्या मारकडवाडी गावात तुम्ही फेरमतदान घेण्याची मागणी केली त्या गावातील सरपंच आज समोर येऊन हे पवारांनी केलेले कारस्थान होतं असं सांगत असल्याचं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.

आमदार गोपीचंद पडळकरांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, लोकशाहीत निवडणुका अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. ज्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निवडणूक आयोग, ईव्हीएम मशिनवर विरोधकांनी खापर फोडले. लोकसभेला महायुतीला अपयश आले, परंतु कोणावर टीका टिप्पणी न करता महायुतीच्या नेत्यांनी आपलं कुठे चुकलंय हे लक्षात ठेवून चुका दुरुस्त केल्या. विधानसभा निवडणुकीत मविआ नेते हवेत होते. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला मतदान होईल या भ्रमात होते. लोकसभेला लागलेला निकाल जनतेचा कौल आहे असं ते बोलत होते. मात्र विधानसभेत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमवर बोलू लागले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच ज्या शरद पवारांनी मारकडवाडीतील ग्रामस्थांना पुढे करून निवडणूक आयोगासारख्या जबाबदार आणि विश्वासार्ह संस्थेवर आरोप केले. गावकऱ्यांना हे आरोप करायला पवारांच्या कार्यकर्त्यांनी लावले असं तिथले सरपंच सांगतात. निवडणूक आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी शरद पवारांसह त्यांच्यासोबत जे नेते होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दत्ता मारकड हे विरोधी पक्षात मतदानादिवशी बुथवर होते. आता ते समोर येऊन शरद पवारांनी त्यांना सांगितलेले कारस्थान उघड करत आहेत. मारकडवाडी ९० टक्के धनगर समाजातील लोकांचे गाव आहे. मारकडवाडीतील सरपंच आणि उपसरपंच आज पुढे येऊन सांगितले, त्यामुळे शरद पवार कारस्थान करतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. 

दरम्यान, शरद पवार आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. ते भांडणे लावतात, वाद काढतात. एका बाजूला मंडल यात्रा काढतात दुसऱ्या बाजूला लेक आणि नातू मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हणतात. एकाचवेळी दुतोंडी भूमिका कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावे. निवडणुकीत २ माणसे भेटायला आले, त्यांचा प्लॅन समजून घेतला. त्या लोकांना घेऊन राहुल गांधींना जाऊन भेटले. १६० आमदार निवडून आणू देऊ शकतात. हे सगळे ७-८ महिन्यांनी सांगतायेत. पोलिसांना काहीच सांगितले नाही. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणीही गोपीचंद पडळकर यांनी केली. 
 

Web Title: Sharad Pawar is a factory of conspiracy in Maharashtra"; BJP MLA Gopichand Padalkar criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.