"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:12 IST2025-05-01T20:12:18+5:302025-05-01T20:12:55+5:30
"शरद पवार जसं म्हणाले ना की मी लहाणपणी पूजा करत होतो. एआय तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, उद्या ते त्यांची मुंज झालेलीही दाखवू शकतात. कारण..."

"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
ठाण्यातील पाचपाखाडी भागात उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मंदिरात शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी, "काही लोक असे म्हणतात की, मी अशा कार्यक्रमाला जात नाही. परंतु ते अर्ध सत्य आहे. त्यांना आज कदाचित उत्तर मिळाले असेल की, मी लहानपणापासून कित्येक पूजा केल्या आहेत," असे म्हणत, शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे (नाव न घेता) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. एवढेच नाही तर, मी मुख्यमंत्री असतानाही पंढरपुरात चार वेळा पूजा केली असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यानंतर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना प्रत्युत्तर दिले आहे.
प्रकाश महाजन म्हणाले, "मला या गोष्टी फार आश्चर्य वाटलं, साताऱ्यातील त्यांचे भाष 'आम्ही तुमच्या देवाचे बाप', अशी त्यांची भाषणे आहेत. म्हणजे आम्ही पंढरपूरच्या मंदिरात न जाता कसे बारे कट्ट्यावर गप्पा मारत होतो, ही भाषणं आम्ही ऐकली आहेत. पण ते शरद पवार आहेत, आता एआय तंत्रज्ञाच्या सहाय्याने, ते सोवळ नेसून पुजा करतानाही दाखवू शकतात. पण शेवटी, शरद पवार असूदेत अथवा जितेंद्र आव्हाड असूदेत, त्यांना शरण धर्मालाच यावे लागले आणि तेही हिंदू धर्मालाच यावे लागले. यांनी आयुष्यभर ज्यावर टीका केली, आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांना धर्माचाच आधार घ्यावा लागला." महाजन एबीपी माझासोबत बोलत होते.
महाजन पुढे म्हणाले, "शरद पवार जसं म्हणाले ना की मी लहाणपणी पूजा करत होतो. एआय तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, उद्या ते त्यांची मुंज झालेलीही दाखवू शकतात. कारण आता आपण हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. मग धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे."
"जितेंद्र आव्हाड यांनी आयुष्यभर ज्या लोकांचा उदो-उदो केला, शेवटी त्यांना तुळजा भवाणी मंदीर बांधावेच लागले. ही हिंदूंची ताकद आहे," असे म्हणत महाजन यांनी आव्हाडांनाही टोला लगावला.