शिंदेंचं कौतुक, ठाकरेंचा संताप! शिंदेसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:05 IST2025-02-12T13:01:49+5:302025-02-12T13:05:29+5:30
ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे असं सामंत म्हणाले.

शिंदेंचं कौतुक, ठाकरेंचा संताप! शिंदेसेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना सुनावले
मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते दिल्लीत सत्कार करण्यात आला. महादजी शिंदे नावाचा पुरस्कार देऊन एकनाथ शिंदेंना गौरवण्यात आले. परंतु याच सन्मान सोहळ्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. संजय राऊतांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेत थेट शरद पवारांना टार्गेट केले. महाराष्ट्राच्या शत्रूंना असे पुरस्कार देणे कुणालाही रूचले नाही असं सांगत ठाकरे गटाने शरद पवारांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. मात्र राऊतांच्या टीकेवरून शिंदेसेनेच्या नेत्यांनी राऊतांना सुनावले आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, संजय राऊत स्वत:ला विश्वज्ञानी प्रवक्ते समजात. विश्वातलं परिपूर्ण ज्ञान त्यांनाच आहे आणि त्याच्याविरूद्ध कुणी भूमिका घेतली तर त्यांना खपत नाही. शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा विसंगत भूमिका तुमची असेल मग महाविकास आघाडीतून बाहेर पडा. संजय राऊतांना वैफल्य आलं आहे. उबाठाचं राजकीय स्थान दिवसेंदिवस खाली जात चाललंय, त्याला कारणीभूत संजय राऊत आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे हे ठरवण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. केंद्रीय निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट इथं आम्ही आमचे पुरावे दिले, कागदपत्रे दिले, प्रतिज्ञापत्र दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असा निर्णय दिला. या निर्णयाला सुप्रीम कोर्टानेही स्थगिती दिली नाही. आमचे नाव तेच चिन्हही तेच आहे. पक्ष फोडायचा विषयच येत नाही. २०१९ ला ज्यांच्याविरोधात आपण निवडणूक लढलो त्यांच्यासोबत जात सत्तेत बसला, त्याचे उत्तर आधी द्यावे असा टोला त्यांनी लगावला.
तर संजय राऊत स्वत:ला एवढे मोठे समजतात की शरद पवारांनी काय करावे आणि काय नाही हे सांगतात. ज्यांना गद्दार म्हणताय त्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात मग राजीनामा द्यावा. शिवसेना-भाजपा म्हणून विधानसभा निवडणूक लढली आणि सत्तेसाठी तुम्ही कोणासोबत गेला, तेव्हा लोकांच्या मतांची गद्दारी केली. आपली योग्यता काय हे विधानसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले. मशिदीत जाऊन पाया पडत होते. बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी यांनी केली. रणांगणात एकनाथ शिंदे लढले, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांच्याशी लढले आणि बाळासाहेबांच्या विचारांशी पक्ष बांधून ठेवला. महाराष्ट्रातील जनतेने त्याचे फळ निवडणुकीच्या निकालात दिले आहे असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
दरम्यान, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान केला. त्यांच्या भाषणात एकनाथ शिंदेंचं कौतुक केले. ज्या व्यक्तीनं ५६ वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिले त्या शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक करून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे. एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारा माणूस त्यांच्यासाठी वाईट असतो म्हणून ते शरद पवारांवर बोलतायेत. साहित्य संमेलनाला दलाली म्हणत असतील तर हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं घणाघात मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर केला.