Sharad Pawar is Chanakya and Chandragupta in politics - Nana Patekar | शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर  

शरद पवार हेच राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘चंद्रगुप्त’ही - नाना पाटेकर  

पिंपरी : लहानपणी शरद पवार हे माझे हिरो होते, त्यांचे वय २५ तर माझे १५. महाराष्ट्रासाठी ही व्यक्ती काहीतरी करेल, असे मला वाटायचे. पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत, असे मला सुरुवातीला  वाटायचे. काही काळानंतर असे वाटायला लागले की, या माणसाने एकही ‘चंद्रगुप्त’ केला नाही हे दुर्दैव. परंतु काही काळानंतर समजले की, शरद पवार हेच ‘चाणक्य’ आणि ‘चंद्रगुप्त’ही तेच आहेत, अशी टिपणी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.

कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत समीरण वाळवेकर यांनी घेतली. या वेळी व्यासपीठावर डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, सदाशिव खाडे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उमा खापरे, संयोजक अमित गोरखे, अनुराधा गोरखे, मधुकर बाबर आदी उपस्थित होते.

‘‘अंधारात सुख शोधायचे असते. आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकायलाच हवे असे काही नाही. पटावर फक्त पाठ टेकवायची नसते, या नानांच्या पहिल्याच वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. पाटेकर म्हणाले, ‘‘जगण्यातील आगीत होरपळल्यानंतर दैन्य सांगून सहानुभूती मिळविणे मला आवडत नाही. ही माणसाने पायरी म्हणूनही वापरू नये. माणसाने सकारात्मक पद्धतीने जीवन जगायला हवे. हे मला परिस्थितीने शिकविले. मी नेहमी मते ठाम ठेवली.’’

खलनायक भूमिकांविषयी नाना म्हणाले, ‘‘प्रत्येक भूमिकेतून घुसमट व्यक्त होत असते. खलनायकांच्या अनेक भूमिका केल्या असल्या तरी त्या मानसिकतेत जायला मला आवडत नाही. लहानपणी वडिलांबरोबर तमाशा पाहायला जात असेहनुमान थिएटरमध्ये दादू इंदोरीकर, वसंत अवसरीकर यांचे गाढवाचं लग्न पाहिले आहे.’’    

‘गाढवाचं लग्न’मध्ये काय सोंगाडे काम करायचे. त्यातील एक सोंगाड्या म्हणजेच वसंतराव. या कलावंतापासून मला अभिनय शिकायला मिळाला. अभिनय हा शरीरातच भिनायला हवा. हे कोणत्याही विद्यापीठात शिकायला मिळत नाही. जीवनात ‘अपमान’ आणि ‘भूक’ हे दुसरे गुरू ठरले. अचानक एखाद्या गोष्टीवर मी भावूक होतो आणि डोळ्यांत पाणी तरळते. त्यावेळी मी विचार करतो, असे का झाले, तर त्यांचे उत्तर असते. त्यावेळी जे राहून गेले आहे, ते आता रडून घेत आहे, असेही नाना म्हणाले.

हास्याचा खळखळाट आणि विदीर्ण घटनांनी अंतर्मुख
चिंचवडमधील बांधकाम प्रकल्पांवर मुकादम म्हणून केलेले काम येथपासून तर चित्रपट, नाट्य सृष्टीतील यशशिखरापर्यंतची वाटचाल, शेतकरी आत्महत्येपासून नाम फाउंडेशन आणि राजकारणापर्यंत व्यक्त केलेली सडेतोड मते, नानांचा जीवनपट मुलाखतीतून उलगडला. कलावंत आणि माणूसपण जपणा-या नानांचे जीवनदर्शन घडले. खमासदार किस्यांतून हसविण्याबरोबरच, मन विदीर्ण करणाºया काही घटनांच्या आठवणींनी रसिकांचे डोळे पाणावले. सामाजिक भान आणि नवी उमेद देत नानांनी रसिकांना अंतर्मुख करायला लावले.

अंमलबजावणी आणि पायमल्ली
राजकारणावर नाना म्हणाले, ‘‘सर्व पक्षांत सर्व सुंदर आहे. सर्वांमध्ये वागायचे कसे अशी आचारसंहिता असते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. पायमल्लीच अधिक होते. सर्वच पक्षांत माझे मित्र आणि स्नेही आहेत. मी राजकारणात गेलो नाही, कारण म्हणजे, मला सडेतोड बोलायची सवय आहे. मी जर कोणाला चूक म्हटलो तर लगेच मला पक्षातून काढून टाकतील आणि मला दुसºया पक्षात जावे लागेल. तेथेही पुन्हा तेच झाले तर पक्षच शिल्लक राहणार नाही. म्हणून राजकारणात गेलो नाही.’’

मॉलमध्ये भाव करता का?
‘शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी’ या विषयावर नाना म्हणाले, ‘‘आत्महत्या करण्याच्या क्षणी माणसाने क्षणभर विचार करायला हवा. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाला थांबला तर जीवन सावरू शकेल. शेतमालाचे दर वाढले तर तुमचे वेळापत्रक बिघडते. मॉलमध्ये भाव करता का? मात्र, शेतकºयांच्या मालाला भाव नसल्याने त्याचे वेळापत्रक बिघडलंय त्याचे काय? कर्जमाफीबरोबरच शेतीचे शास्त्र बळीराजाला समजून सांगितले पाहिजे. विकणार पीक घ्यायला हवे. सतत बदल करायला हवा.’’  

अशोक सराफ माझ्यासाठी हरायचा
पाटेकर म्हणाले, ‘‘हमीदाबाईची कोठी नाटकाच्या वेळी मला ५० रुपये नाईट मिळायची, तर अशोक सराफ यांना तीनशे. त्यावेळी दीडशे रुपयात महिन्याचे राशन मिळायचे. तीन-चार प्रयोग केले की, महिन्याचा खाण्याचा प्रश्न मिटायचा. त्यावेळी अशोक मला मदत करायचा. आम्ही रमी खेळायचो. त्यात तो हरायचा आणि १५ रुपये मला मिळायचे. त्याचे अंग चेपून दिले की पाच रुपये द्यायचा. हे सगळंतो माझ्या परिस्थितीसाठीच करायचा हे मला कळायचं. आता जरी तो मला भेटला तर मी त्याचे अंग चेपून देतो. आणि तो मला पाच रुपये देतो. वरून म्हणतो, महागाई वाढलीय.’’ यावर जोरदार हास्याची लाट उसळली.

Web Title: Sharad Pawar is Chanakya and Chandragupta in politics - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.