शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यभर राबवणार - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:11 IST2025-01-09T18:10:41+5:302025-01-09T18:11:32+5:30
नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षण परिवर्तनासाठी मार्गदर्शक

शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यभर राबवणार - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे
सांगली : थोर विचारवंत, शांतिनिकेतनचे संस्थापक संचालक, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारधारेतून सुरू असलेले शांतिनिकेतनमधील विविध उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत आहेत. राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणारे प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, संचालक संपत गायकवाड, उपसंचालक महेश चोथे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी प्रमुख उपस्थित होते.
राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांची पहिल्यांदाच चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात झाली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला, क्रीडा शिक्षकांची भरती तातडीनेे होणे आवश्यक असल्याचे संस्था प्रतिनिधींनी मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणले. यावेळी मंत्री भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
या चर्चासत्रात नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे प्रतिनिधी डी. एस. माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रगत संकल्पना, वक्तृत्व शैलीसाठीचा ‘बोलका’ उपक्रम, समृद्ध खेळ, सांस्कृतिक कार्यशाळा, गायन-वादन आणि मातीकाम यासारख्या संस्थेकडून वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली.
यावेळी मंत्री भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक केले. विविध क्षेत्रातील उपक्रम हे शांतिनिकेतनमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहेत. याची प्रत्यक्ष दखल विभागीय शिक्षण उपसंचालक, क्रीडा संचालकांनी घेत तसा अहवाल शासनास सादर केला आहे.
अभिमानाची बाब- गौतम पाटील
शांतिनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत, याचा आनंद आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल, याची खात्री आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे संचालक गौतम पाटील यांनी सांगितले.