DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 15:07 IST2025-07-20T15:06:09+5:302025-07-20T15:07:05+5:30
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यातील वाद तसेच उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना कुणाची? यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट मत मांडले.

DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती विविध विषयांवर अगदी स्पष्ट शब्दांत भाष्य करत असतात. चातुर्मासाची सुरुवात झाली असून, शंकराचार्य मुंबईत आहेत. ठाकरे बंधूंची युती, मराठी अस्मिता, हिंदी सक्ती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची निवृत्ती अशा अनेक विषयांवर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सविस्तर मते मांडली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार असल्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. लवकरच तो ग्रंथ येईल आणि एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिलेले सर्वांना पाहता येईल, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही कोणती नवीन मोहीम सुरू केलेली नाही. ही आमची पहिल्यापासून सुरू असलेली योजना आहे. जे लोक चांगले काम करतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ताम्र अक्षरात, रौप्य अक्षरात, सुवर्ण अक्षरात नावे लिहितो. अमूक एखाद्याचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असे वाक्य आपण नेहमी ऐकतो. मीही लहानपणापासून ऐकत आलो आहे. असे कोणते पुस्तक आहे की, ज्यात सुवर्णाक्षरांनी नाव लिहिले जाते, असा विचार आम्ही करत होतो. आम्ही शोध घेतला असता संपूर्ण जगात असे कोणतेही पुस्तक नसल्याचे आढळून आले. मग आम्हीच सुवर्णाक्षर ग्रंथाची स्थापना केली. जो चांगले काम करेल, त्याचे नाव सुवर्ण अक्षरात लिहायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमाता दर्जा दिला. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्णाक्षर ग्रंथात सुवर्ण अक्षरात लिहिणार असल्याची घोषणा आम्ही केली. एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, अशी माहिती शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दिली.
विरोध करणारे विरोधच करत राहतात
एकनाथ शिंदे यांचेच नाव का, एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यावर विरोध होऊ शकतो, या प्रश्नावर बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, कोणता दुसरा मुख्यमंत्री असेल, तर सांगा. अशा प्रकारे कोणत्या मुख्यमंत्र्यांनी काम केले, तर त्यांच्या नावाचाही विचार करता येऊ शकेल. जो काम करतो, त्याचेच नाव होते. विरोध करणारे विरोधच करत राहतात. विरोध करणे हा अधिकार आहे. परंतु, विरोध करताना योग्य तर्क देणे आवश्यक आहे. भारतीय परंपरेत गायीला सदैव मातेचा दर्जा आहे. तेच आम्ही सांगत होतो. देशातील कोणत्याच सरकारने अशा प्रकारे पुढाकार घेतला नाही. तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांना त्याचे श्रेय दिले जात आहे. यात अडचण काय, असा प्रतिप्रश्न शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला.
शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार
शिवसेना ही शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार स्वतःचा नाही, तर याच मातीतून त्यांना विचारांचा वारसा मिळाला आहे. तो विचार महाराष्ट्राच्या मातीचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद आहे. त्यांचा पराक्रम याची ओळख आहे. अशातच शिवसेनेचे कितीही तुकडे झाले, तरी प्रत्येक तुकडा शिवसेना म्हणूनच ओळखला जाईल. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गावर, विचारांवर चालेल, ती शिवसेनाच असेल. दोन्ही शिवसेनेकडून आपणच खरी असल्याचे दावे केले जात आहेत. आम्ही राजकारणी नाही आणि यांचे मतदार नाही. अशा परिस्थितीत खरी शिवसेना कोणती आणि खोटी शिवसेना कोणती, यावर कसे बोलता येणार, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
मुंबईला गुजरातशी जोडण्याची योजना यांना कशी समजली
मुंबईला गुजरातशी जोडण्याची योजना असेल, तर ते यांना कसे समजले. जिथे बैठका होत होत्या, तिथे हे होते का? मुंबईला गुजरातशी जोडले जाण्याचा डाव आहे, हे त्यांना कसे समजले. गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते आणि महाराष्ट्रात मराठी बोलली जाते. मराठीच्या नावाखाली महाराष्ट्र वेगळा झाला आणि गुजरात राज्य गुजरातीच्या नावाखाली निर्माण झाला. मग आता मराठी मुंबई गुजरातमध्ये कसे जाईल? गुजरात महाराष्ट्रात कसा जाईल? भाषेच्या नावाखाली गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये झाली. मग हिंदी भाषा सुरू करून मुंबईला गुजरातशी कसे जोडणार? महाराष्ट्रात जशी हिंदी आहे, तशीच गुजरातमध्ये आहे. हे सगळे तर्क आधारहीन आहे. हे राजकीय डावपेच आहेत, असे सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यात सुरू असलेल्या वादावर बोलताना, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, हा राजकीय आखाडा आहे. दुर्दैवाने यात उतरलेले पैलवान हिंसक भाषेलाच चांगली भाषा समजत आहेत. मग ते निशिकांत दुबे असोत किंवा राज ठाकरे दोन्ही नेते तशीच भाषा बोलत आहेत. बुद्धिमान लोकांनी हिंसाचाराला किती प्रमाणात स्थान देणे योग्य आहे? त्याचा विचार केला पाहिजे. भाषा आपल्याला आईकडून मिळते किंवा गुरुकडून मिळते. आई कधी हिंसा करायला शिकवत नाही, गुरूही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाहीत. भाषेला हिंसा जोडण्याचे काम राजकारणी करत आहेत, हे मान्य होऊ शकत नाही, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले. ते टीव्ही९शी बोलत होते.