विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी शाहीर संभाजी भगत, साताऱ्यात १५ वे संमेलन होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:03 IST2026-02-06T13:01:19+5:302026-02-06T13:03:19+5:30
साताऱ्यात २२ वर्षांनंतर संमेलन.., मे महिन्यात दोन दिवस चालणार

संग्रहित छाया
सातारा : सातारा शहरात दि. २ आणि ३ मे रोजी १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होत असून अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक, शाहीर आणि विद्रोही शाहिरी जलशाचे प्रवर्तक संभाजी भगत यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘विद्रोही’चे ज्येष्ठ नेते डॉ. बाबूराव गुरव, ‘विद्रोही’चे मार्गदर्शक व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी दिली.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष कॉ. विजय मांडके, सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते.
शाहीर संभाजी भगत हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाचगणीजवळील महू गावचे आहेत. लहानपणापासूनच गावातील कलावंतांची गायकी ऐकतच मोठे झाले. भजन व भारुडांवर संभाजी भगत याचा कलावंत पिंड पोसला गेला. नंतर पुढे ते मुंबईत गेले. तसेच ते डाव्या चळवळीशी जोडले गेले. संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालेल्या कोर्ट या चित्रपटातील एक गाणे त्यांनी गायले आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या आगळ्यावेगळ्या अशा नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली.
लवकरच कार्यक्रम पत्रिका...
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आणि विद्रोही संमेलन संयोजन समितीच्या वतीने लवकरच साताऱ्यात होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी दिली आहे.
साताऱ्यात २२ वर्षांनंतर संमेलन...
सातारा येथे यापूर्वी चौथे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
विद्रोही साहित्य संमेलनांचा प्रवास...
पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडले होते. त्यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेत.