चार महिन्यांपूर्वी लग्न, बुलेटवरुन पुलावर आले अन्... कृषी खात्यातील वरिष्ठ लिपिकाची गोदावरीत मारली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:11 IST2025-08-06T16:11:32+5:302025-08-06T16:11:48+5:30
प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी मारून नेवासा तालुका कृषी विभागातील वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केली.

चार महिन्यांपूर्वी लग्न, बुलेटवरुन पुलावर आले अन्... कृषी खात्यातील वरिष्ठ लिपिकाची गोदावरीत मारली उडी
Nevasa Senior Clerk Death: नेवासा येथील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी मारुन नेवासा तालुक्यातील कृषी विभागातील वरिष्ठ लिपिकाने आत्महत्या केली. जालन्यातील संतोष महाजन बहुरे असे मृताचे नाव आहे. नेवासा येथे कृषी विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. शनिवारी सायंकाळी नेवासा फाटा येथील घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत नातेवाइकांनी रविवारी नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह गोदावरी नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
सोमवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आली. जुने कायगगाव नदी पात्रातील पाण्यात मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळला होता. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या मूळ गावातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ, भवजयी, पुतण्या असा मोठा परिवार आहे.
संतोष हे त्यांच्या बुलेटने जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर आले होते. तिथून त्यांनी गोदापात्रात उडी घेतली. काही मच्छिमारांनी त्याला पाहिले होते. मात्र वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे संतोष यांला वाचवला आले नाही. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगून वर आला. चांभारवाडी येथील महाजन बहुरे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी पोटाला चिमटा देऊन मनोज आणि संतोष या दोन्ही भावांना उच्च शिक्षण दिले होते. मनोज हे नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात आहे. चार महिन्यांपूर्वीच संतोष यांचे लग्न झाले होते. पतीचा मृतदेह पाहून त्यांच्या पत्नीने टाहो फोडला. संतोष यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेलं नाही.