The science fiction work started by the senior citizens | गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची 
गौरवगाथा... ज्येष्ठांनी सुरु केलेल्या विज्ञानप्रसाराच्या '' पंचविशी '' ची 

ठळक मुद्देनिवृत्तांचा उपक्रम : ग्रामीण भागात विज्ञानप्रसारउपक्रमाची माहिती होऊन त्यांना आसाम, नागालँड, मिझोराम येथून बोलावणेस्वखर्चातून किंवा संस्था, संघटनांकडून देणग्या घेऊन संस्थेचा, उपक्रमांचा खर्च भागवतात.

- राजू इनामदार
पुणे: नोकरी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित काळ सुखाने व्यतीत करण्याचे सोडून त्या २५ जणांनी ग्रामीण भागातील शाळांमध्येविज्ञानप्रसार करण्याचे ठरवले. त्या लहानशा रोपट्याचा आता २५ वर्षानंतर वटवृक्ष झाला असून फक्त राज्यातच नाही तर राज्याबाहेरही त्यांनी कामाचा डोंगरच उभा केला आहे.
अमेरिकास्थित मधूकर व पुष्पा देशपांडे यांची ही कल्पना. त्यांना विज्ञानाशी संबधित काही सामाजिक काम करण्याची इच्छा होती.

ती त्यांनी भारत दौऱ्यात काही स्नेह्यांजवळ व्यक्त केली. विज्ञानाची पार्श्वभूमी असलेले त्यांचे हे काही स्नेही एकत्र आले व त्यांनी लगेच सुरूवातही केली. देशपांडे दांपत्याने त्यांना ३२ आसने असलेली एक गाडी घेऊन दिली. तिच्यात प्रयोगांचे साहित्य ठेवून त्यांनी भ्रमंती सुरू केली. उद्दीष्ट ठेवले ग्रामीण शाळांचे. इयत्ता ५ पासून ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते त्यांच्या अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासाबाहेरचेही विज्ञान प्रयोग करायला लावतात, त्यामागचे वैज्ञानिक तत्व समजावून सांगतात. प्रात्यक्षिके, व्याख्याने घेतात.
एका गाडीच्या तीन गाड्या झाल्या. संस्थेचे विज्ञानवाहिनी असे नामकरण झाले. काही व्यक्तींच्या २५ पेक्षा जास्त व्यक्ती झाल्या. शेकडो शाळा व लाखो विद्यार्थी झाले. त्यांच्या या उपक्रमाची माहिती होऊन त्यांना आसाम, नागालँड, मिझोराम येथून बोलावणे आले. रेल्वेने जाऊन त्यांनी तिथेही या उपक्रमाची मुहुर्तमेढ रोवली. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रोगोंदे तालुक्यातील सुरोडी गावात पाण्याचा दुष्काळ पडला. तिथे बंधारे तुटले होते. ते सगळे या विज्ञानप्रेमींनी गावातीलच लोकांची मदत घेऊन दुरूस्त करून दिले. आज गावात पाणीच पाणी आहे.
एकाही उपक्रमासाठी विज्ञानवाहिनीकडून पैसे आकारले जात नाही. सगळेच कार्यकर्ते वैज्ञानिक पार्श्वभूमी असलेले. स्वखर्चातून किंवा संस्था, संघटनांकडून देणग्या घेऊन संस्थेचा, उपक्रमांचा खर्च भागवतात. काही धर्मादाय संस्था उपक्रमाची माहिती मिळताच स्वत: होऊन देणग्या देतात. देशपांडे दांपत्याने दिलेल्या गाडीनंतर आणखी दोन गाडया झाल्या. खर्च वाढतो म्हणून दोन बाद केल्या. आता एक जनरेटर, १० टेबल, आतमध्येच वॉश रूम वगैरे असलेली एकदम अत्याधुनिक अशी एक गाडी आहे. प्रयोगांचे साहित्य आहे. त्यात नवनवीन भर पडत असते. नवे शोध, नवे प्रयोग यांची विद्यार्थ्यांना आवर्जून माहिती दिली जाते.
शरद गोडसे संस्थेचे नियोजन, संयोजन, आयोजन असे सर्व काही पाहतात. कोणालाही नावाची हौस नाही. जवळपास २५ जणांचा मोठा ग्रुप आहे. बहुतेकजण निवृत्त झालेले, वयाने साठी सत्तरीच्या पुढचेच. विज्ञानप्रसार हेच त्यांचे ध्येय आहे. त्रास, दगदग होत नाही का असे विचारल्यावर गोडसे म्हणाले, ‘‘तसे असले असते तर मग कोणी एकत्र आलेच नसते. कोणालाही या कामाची दगदग होत नाही. उलट शाळांचा दौरा वगैरे असे असले की उत्साहच येतो.’’
गेल्या काही वर्षांपासून विज्ञानवाहिनीने पुण्यात जूनमध्ये ४ दिवसांचे एक विज्ञानशिबिर घेण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठीही ग्रामीण भागातील शाळा त्यांचे विद्यार्थी निवडून पाठवतात. या निवासी शिबिरात विज्ञानविषयक काम करणाऱ्या, संस्थांची भेट, व्याख्याने, प्रयोग असे बरेच काही विद्यार्थ्यांना दिले जाते. दरवर्षी १५० शाळा व हे ४ दिवसांचे निवासी शिबिर असे विज्ञावाहिनी गेली २५ वर्षे न दमता, न थकता करते आहे..


Web Title: The science fiction work started by the senior citizens
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.